आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात एकही शहर असे नाही की तेथे पाणी टंचाई नाही. जिल्ह्यात १९ नगरपालिका/नगरपंचायत आहेत. त्यापैकी एकही शहर असे नाही की तेथे दररोज पाणीपुरवठा होतो. किमान दोन तर जास्तीत जास्त १२ दिवसाआड पाणीपुरवठा या शहरांमध्ये होत आहे. उन्हाळा आहे म्हणून नव्हे तर वर्षभर हीच स्थिती असते. नागरिकांची दररोजची तहान भागवण्यात पालिका, स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहे. शहरांचा विस्तार झाला मात्र जुनाट पाणीपुरवठा यंत्रणा कायम असल्याने नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही.
केवळ उन्हाळ्यात नव्हे तर वर्षभर असते पाणी टंचाई उन्हाळ्यामुळे जलस्रोत आटल्याने टंचाई तर भासतेच मात्र जिल्ह्यातील या शहरांमध्ये नियोजनाच्या अभावामुळे वर्षभर पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसात टंचाईच्या दिवसात आणखी वाढ होते. सध्या पाचोरा, धरणगाव, भुसावळ, पारोळा, अमळनेर या शहरांमध्ये टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. प्रत्येक शहरातील वाढीव भागात तर प्रचंड हाल आहेत.
शिरपूर पालिकेला शक्य इतर पालिकांना का नाही?
धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपालिका नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करते, तेही शुद्ध. विद्युत पंपाविना तिसऱ्या मजल्यावर सहज पाणी पोहोचते, हे शिरपूर पालिकेला शक्य आहे तर जळगाव जिल्ह्यातील पालिकांना काय अडचण आहे? शिरपूर पालिकेचा आदर्श घेतल्यास जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागू शकते.
शहरांमध्ये किती दिवसाआड येते पाणी भुसावळ ८ वरणगाव १२ बोदवड ८ ते १० धरणगाव ८ ते १० पारोळा १० ते १२ नशिराबाद ७ ते ८ चोपडा ७ शेंदुर्णी ७ जामनेर ४ एरंडोल ४ अमळनेर ४ चाळीसगाव ४ भडगाव ४ पाचोरा ५ रावेर १ सावदा १ यावल २ मुक्ताईनगर २ फैजपूर १
जलसाठा मुबलक तरीही घसा कोरडाच
जिल्ह्यात भुसावळ, वरणगाव या शहराच्या काठावरुन बारमाही तापी नदी वाहते तर मुक्ताईनगर शहरानजीकच तापी-पूर्णा नदी आहे. या शहरांना दररोज पाणीपुरवठा शक्य आहे मात्र भुसावळात आठ दिवसाआड, वरणगावात १२ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. पारोळा, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा या शहरांना ज्या धरणांमधून पाणी पुरवठा होतो, तेथेही मुबलक साठा आहे मात्र तेथेही दररोज पाणीपुरवठा करण्यात पालिका अपयशी ठरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.