आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:‘हनुमान चालिसा’ भोंग्यावर पठणासाठी एकही अर्ज नाही; जिल्हा पोलिस अधीक्षक मुंढे यांनी घेतला आढावा

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. मंगळवारी रमजान ईद झाल्यानंतर ४ मे रोजी राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते हनुमान चालिसा पठण करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, जिल्ह्यात भोंगे वाजवण्यासाठी सोमवारी रात्रीपर्यंत पोलिसांकडे एकही अर्ज आलेला नाही.

पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सोमवारी रात्री ग्रुप कॉल करून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. धार्मिक स्थळांजवळ गस्त वाढवण्यात येणार आहे. संवेदनशील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही प्रभारी अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी आपल्या हद्दीत रुटमार्च करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण केला. दरम्यान, पोलिसांकडे परवानगी न मागता भोंगे वाजवल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली.

जिल्ह्यात आजपर्यंतची स्थिती
जिल्ह्यात ६२७ मशिदी असून, ६३ मशिदींनी भोंग्यासाठी परवानगी मागितली. त्यानुसार ५६ मशिदींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच २,६७७ मंदिरे असून १७ मंदिरांनी भोंग्यासाठी परवानगी मागितली. नऊ मंदिरांना परवानगी देण्यात आली आहे.

विनंती अर्ज करणे अपेक्षित
धार्मिक स्थळी भोंगे वाजवण्यासाठी पोलिसांकडे अर्ज करणे अपेक्षित आहे. परवानगी घेतली नाही तर कारवाई करू. परवानगी मागणाऱ्यांच्या परिसराची पाहणी करून निर्णय घेऊ.
प्रवीण मुंढे, पोलिस अधीक्षक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...