आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • There Is Not A Single Professional Woman Who Wears A Hat; There Are 56 Types Of Headdresses For Weddings In Maharashtra And 3 To 4 Types In Jalgaon |marathi News

दिव्य मराठी विशेष:फेटे बांधणारी एकही व्यावसायिक महिला नाही; लग्नकार्यात महाराष्ट्रात 56 तर जळगावात 3 ते 4 प्रकारात बांधले जातात फेटे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सर सलामत तो पगडी पचास’, असे म्हणतात. यातला गमतीचा भाग सोडला, तर प्रत्येक मैलावर भाषा बदलते तसे वेशभूषा, फेटा यातही बदल होत असतो. प्रत्येकाची फेटे बांधण्याची पद्धतही वेगळी. लग्नात नवरदेवासह वऱ्हाडींना फेटे बांधण्याची ३० वर्षांपासून पद्धत आहे. महाराष्ट्रात ५६ प्रकारचे फेटे बांधले जात असले तरी शहरात यातील केवळ तीन ते चार प्रकारचे फेटे बांधले जातात. फेटे बांधण्यात केवळ माणसांचीच मक्तेदारी आहे. शहरात एकही फेटे बांधणारी व्यावसायिक महिला नाही.

लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांना माणसांसह महिला फेटे बांधण्यास पुढाकार घेतात. असे असले तरी फेटे बांधून देण्यासाठी शहरात एकही महिला व्यावसायिक नाही. शहरात एकूण १२ फेटे बांधणारे व्यावसायिक असले तरी एकही महिला व्यावसायिक नाही. फेटा बांधण्याची कला शिकण्यासाठी कुणीही महिला पुढाकार घेताना दिसत नाही. शहरातील काही फेटा बांधणाऱ्यांनी यासाठी मोफत प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली होती; मात्र इच्छाशक्तीअभावी कुणी पुढे येत नाही. त्यामुळे महिला असो की पुरुष सर्वांनाच पुरुषांकडून फेटा बांधून घ्यावा लागत आहे.

मोदी, कोहलीला बांधले जळगावचे फेटे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर १५ ऑगस्ट २०१४च्या स्वातंत्र्यदिनी जळगावहून आलेला फेटा डोक्यावर चढवला. तर विराट कोहली याच्या लग्नाचा फेटाही जळगावातून तयार करून दिला. यात मोदी यांचा फेटा तयार करण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रो. कछवा यांच्या सांगण्यानुसार २४ इंची डोक्याचा फेटा बनवून दिला होता. तर बाळू नेवे यांच्या पुण्यातील मित्राच्या सांगण्यानुसार विराट कोहलीचा फेटा तयार केला होता. हे दोन्ही फेटे राजू महाराज फेटेवाले यांनी तयार करून दिले होते.

असे आहेत फेट्याचे प्रकार
कोल्हापुरी फेटा, सोलापुरी फेटा, ब्राह्मणी फेटा, धनगरी फेटा, शेतकरी फेटा, राजस्थानी फेटा, पेशवाई फेटा, पंचरंगी, रेडफणी, लेहरिया, चुनरी, बनारसी, पैठणी, जरी, विणकाम केलेला फेटा आदी ५६ प्रकारचे फेटे बांधण्याचे प्रकार आहेत.

महिला-मुलींनी पुढाकार घ्यावा
आज कोणत्याही समारंभात महिलादेखील पुरुषांच्या बरोबरीने फेटा डोक्यावर बांधून घेतात; मात्र यात पुरुषांचीच मक्तेदारी आहे. मी स्वत: महिला-मुलींना मोफत फेटा बांधून देण्याचे प्रशिक्षण देण्यास तयार आहे. यासाठी श्रावण महिन्यात मोफत प्रशिक्षण देतोही.
राजू महाराज फेटेवाला, जळगाव

बातम्या आणखी आहेत...