आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तितूर नदीचे पाणी पात्राबाहेर:चाळीसगावात 27 दिवसांत पाचव्यांदा आला महापूर, जळगाव जिल्ह्यात 20 मंडळांत अतिवृष्टी

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- सागर खेडकर - Divya Marathi
फोटो- सागर खेडकर

गेल्या ४८ तासांपासून खान्देशात जळगाव जिल्ह्यात मुसळधार तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही काही तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. चाळीसगावात २७ दिवसांत पाचव्यांदा मुसळधार पाऊस झाल्याने तितूर व डोंगरी नदीला महापूर आला असून ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यात हिवरा नदीला महापूर आल्याने पांचळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेला साहेबराव उत्तम पांचाळ (२५) हा तरुण हा हिवरा नदीपात्रात वाहून गेला. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, पाचोरा व भडगाव या चार तालुक्यांसह तब्बल २० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक ११७.३ मि.मी. पावसाची नोंद शेंदुर्णी मंडळामध्ये झाली आहे. दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. २४ तासांत चाळीसगाव तालुक्यात ४४५ मिमी पाऊस झाल्याने खरीप पिकांचा चिखल झाला आहे. गिरणा धरणातील जलसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे.

चाळीसगावात पाचव्यांदा पूर
- ३१ ऑगस्ट- अतिवृष्टी व पुरामुळे ६९ गावांमध्ये २२५२ घरे, झोपड्या, दुकाने व गोठ्यांचे नुकसान, २६३० जनावरे दगावली, १६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान. तिघांचा मृत्यू
- ७ व ८ सप्टेंबर- दुसरा व तिसरा पूर आला. यात ५ हजार ३०० हेक्टर शेतीला फटका बसला. नांद्रे व सायगाव परिसरातील ३५६ घरांची पडझड झाली तर ८० जनावरे मृत.
- २३ सप्टेंबर -रोजी चाैथा पूर आला. यात कमी प्रमाणात नुकसान झाले.
- २८ सप्टेंबर- रोजी पाचवा पूर आला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, शहराचा घाट रोड परिसराशी संपर्क तुटला.

ही आहेत चाळीसगावातील महापुराची कारणे
- अचानक कमी वेळात झालेला अति पाऊस
- नदीपात्रात झालेले अतिक्रमण
- घाण, कचरा व मातीमुळे उथळ झाले नदीपात्र, परिणामी वहन क्षमता घटली
- नदीवरील पुलांमुळे पाणी वाहण्यास अडथळा

गाेदावरीला तिसऱ्यांदा पूर, धरणातून विसर्ग सुरू
नाशिक | शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जाेरदार बॅटिंग सुरू आहे. मंगळवारी दि.२८ पहाटेपासूनच शहर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू हाेता. धरणाच्या पाणलाेट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातूनही ३४०० क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. यामुळे गेल्या पंधरा दिवसात गाेदावरील तिसऱ्यांदा पूर आला. पूर पाहण्यासाठी नागरिकांची सकाळपासूनच गाेदाकाठ परिसरात गर्दी केली हाेती. पावसाचा वाढता जाेर लक्षात घेता धरणातून सकाळी ९ वाजता २००० क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. दुपारी १२ वाजता विसर्ग वाढवत ३००० क्युसेक पर्यंत करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...