आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बदली :8641 शिक्षकांचे प्रोफाइल तयार

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने 27 जूनपर्यंत दिली मुदतवाढ

जिल्हा परिषदेच्या ८६४१ शिक्षकांची माहिती शासनाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरवर टाकण्यात येत आहे. बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, अन्य जिल्ह्यातील माहिती अद्ययावत न झाल्याने या प्रक्रियेसाठी राज्य शिक्षण विभागाने २७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली. उपसचिव का. गो. वळवी यांनी यासंबंधीचे पत्र काढले आहे. या बदल्यांसाठी जिल्हा समन्वयक म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांची बदली प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य सरकारने सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८ हजार ६४१ शिक्षकांचे ऑनलाइन प्रोफाइल तयार केले जात आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बदल्यांची प्रक्रिया सोपी होणार आहे. शिक्षकांना दाद मागण्याची संधीही मिळणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांत घोळ हे नित्याचे असते. मात्र, प्रत्येक शिक्षकाला एकमेकांची माहिती सॉफ्टवेअरद्वारे सहज पाहता येणार आहे. दुसऱ्या शिक्षकांची माहिती दुरुस्ती करण्याची सूचना अथवा आक्षेप नोंदवता येणार आहेत. सर्व शिक्षक व अधिकाऱ्यांना डॅशबोर्ड दाखवले जाणार आहे. तसेच शिक्षकांनी आधार क्रमांक, वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बदली प्रक्रिया पूर्ण होत असताना शिक्षकांनी आपला लॉगिन आयडी व पासवर्ड तयार ठेवावा. शिक्षकांनी मुख्यालयी राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

बीईओ करणार माहिती प्रमाणित
माहिती प्रमाणित करण्याचे अधिकार गट शिक्षणाधिकाऱ्यांना असणार आहेत. सर्व शिक्षकांची ऑनलाइन सॉफ्टवेअरवर प्रोफाइल तयार झाल्यावर त्या प्रोफाइलची तपासणी गट शिक्षणाधिकारी करणार असून ती प्रमाणित करणार आहेत. न्यायालयीन बदल्यांची प्रकरणे, शिक्षकांची माहिती प्रमाणित करणे आदी अधिकार गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

समन्वयकांकडे करता येणार तक्रार
शिक्षकांची प्रोफाइल प्रमाणित करताना शिक्षकांनी आपल्या माहितीत काही बदल झाला आहे, असे वाटत असेल तर शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील करता येईल. शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्यांचे समाधान न झाल्यास शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही अपील करता येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.