आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानादुरुस्त झालेल्या दुधाच्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध टाकले जात असताना मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शुक्रवारी (दि.१३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ झालेल्या या भीषण अपघातात धुळे येथील वसुंधरा डेअरीचे चार आणि जळगाव येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा एक असे एकूण पाच कर्मचारी ठार झाले, तर सहा जण जखमी झाले. ट्रकचालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. धुळे येथील वसुंधरा डेअरीचा दुधाने भरलेला टँकर (एमएच १८ बीआर. ६८३१) मलकापूरकडे जात होता. शुक्रवारी पहाटे घोडसगावजवळ तो नादुरुस्त झाला. चालकाने दुसरे टँकर मागवले. ते पोहोचले व त्यातून दुधाचा उपसा सुरू झाला. उपसा दुसऱ्या टँकरमध्ये झाल्यानंतर पंप बाजूला करत असताना मागून फरशी घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने (जीजे ३६ व्ही ८९३९) जोरदार टँकरला धडक दिली. त्यात पाच कर्मचारी ठार झाले तर सहा जण जखमी झाले. धनराज बन्सीलाल पाटील (४८), भालचंद्र गुलाब पाटील (३१, दोन्ही रा. बिलाडी, जि. धुळे), उमेश राजेंद्र सोळंके (३५, रा. देवपूर, धुळे), पवन सुदाम चौधरी (२५, रा.धुळे), धनराज सुरेश सोनार (३७, रा. शिवाजीनगर, जळगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. मुरलीधर प्रल्हाद कावरे (५१, रा. नशिराबाद, जि. जळगाव), कांतीलाल शांतीलाल ठाकरे (४३, रा. जळगाव), ओम गेंदीलाल ठाकरे (१४, रा. जळगाव), चालक गुड्डू ऊर्फ अजितहरी शंकर यादव (३५, रा. उत्तर प्रदेश), परवेज खान अरबाज खान (२८, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हे जखमी झाले. जखमींवर मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक आलाभाई लुना (रा. जामनगर, गुजरात) याला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल शेळके तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.