आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादुर्भाव:लम्पीमुळे अमळनेर तालुक्यात दोन गुरांचा मृत्यू, पशुपालक झाले हैराण ; पशुपालकांनो घाबरू नका

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर तालुक्यात पाच गावांमधील १८ गुरांना लम्पी आजाराची लागण झाली असून, दोन गुरांचा मृत्यू झाला आहे. लम्पीग्रस्त गुरे आढळलेल्या गावांच्या पाच किमी परिघातील गावांमध्ये गुरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पशुपालकांनी आपल्या गुरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले.

गेल्या काही दिवसांपासून लम्पीने राज्यात थैमान घातले आहे. या रोगाने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे. या आजारात गुरांना ताप येतो. दुधाळ जनावरांची क्षमता कमी होते. तर जनावरांच्या अंगावर गाठी तयार होतात. अमळनेर तालुक्यात लम्पीमुळे १८ गुरे बाधित झाली आहेत. तालुक्यात पशुसंवर्धन विभागाला पाच गावांमध्ये लम्पीग्रस्त गुरे आढळली असून, त्यात मंगरूळ, कावपिंप्री, अमळगाव, मांडळ या गावांसह अमळनेर शहरातील काही गुरांचा समावेश आहे. या पाचही ठिकाणांना पशुसंवर्धन विभागाने इपी केंद्र म्हणून घोषित केले अाहे. प्रतिबंधक उपाय म्हणून या गावांच्या पाच किलोमीटर परिघातील ३० गावातील १४ हजार गुरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. आणखी १५ हजार गुरांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले अाहे. लम्पी हा गुरांचा त्वचारोग आहे. पशुपालकांनी गोठ्यात जास्तीत जास्त स्वच्छता ठेवावी. गुरांमध्ये लक्षणे आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विकास अधिकारी प्रतिभा कोरे यांनी केले.

चिलटे, माश्या, गोचीड अन‌् डासांद्वारे रोगाचा फैलाव
लम्पी आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने माश्या, डास, गोचीड, चिलटे आदी कीटकांच्या चावण्यामुळे होतो. त्यामुळे पशुपालकांनी गोठ्यातील भिणभिणणाऱ्या माशांचा बंदोबस्त करावा. बाधित जनावरांच्या स्पर्शाने ही इतर जनावरांनाही आजाराची लागण होते. त्यामुळे बाधित जनावर हे इतर जनावरांपासून सुरक्षित अंतरावर बांधावे. लम्पीचे विषाणू संक्रमणानंतर रक्तात पसरल्यावर एक ते दोन आठवडे राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी. गुरांचे लसीकरण करून घेतल्यास सुरक्षा मिळते.

अशी आहेत लक्षणे
गुरांच्या डोळ्यातून पाणी येणे, आठवडाभर ताप, त्वचेवर मोठ्या प्रमाणावर गाठी होणे ही लम्पी आजाराची लक्षणे आहेत. जनावरांच्या नाकातून निघणारा श्राव व तोंडातून निघणारे पाणी व लाळ ही चारा आणि पाणी दूषित करते. त्यामुळे इतर निरोगी गुरांनादेखील लम्पीची लागण होते. त्यामुळे गुरे मालकांनी सर्व जनावरांना एकाच ठिकाणी चारा खायला घालू नये. तसेच गावहाळात पाणी पाजू नये. गुरांच्या त्वचेवरील निघणाऱ्या खलपीत लम्पीचे विषाणू असतात. त्यामुळे गुरे मालकांनीही काळजी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...