आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातांबापूरा परिसरात दारू पिण्यावरून तसेच पैशांच्या वादातून दोन तरुणांमध्ये वाद झाला. काही वेळेतच दोन्ही तरुणांनी बोलावलेल्या जमावांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. रविवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. दरम्यान, महिनाभरापूर्वीच तांबापुरात दंगल घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तांबापुरा भागातील महादेव मंदिर परिसरात रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दारू व पैशांच्या कारणावरून दोन जणांमध्ये वाद झाला. दोघांच्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडणानंतर दोन्ही तरूणांनी आपल्या गटातील तरूणांना बोलावून घेतले. त्यानंतर दोन्ही गटातील तरूणांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली व काचेच्या बाटल्या फोडण्यात आल्या. या दंगलीत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टवाळखोरांची धरपकड
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थतीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या घटनेनंतर शनिपेठ काट्या फाइल भागातही जमाव एकत्र आला होता. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. यानंतर रेल्वेस्थानक परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी पांगवले. घटनेनंतर तांबापूरा परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून दंगल करणाऱ्या तरुणांची धरपकड सुरू आहे. त्यांच्यावर आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.