आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयडीसीतील नेहा प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये उत्पादीत पिशव्यांची जाडी मोडण्याच्या पध्दतीवरून सोमवारी मनपा प्रशासनाविरूध्द मालक असा दोन तास वाद झाला. मायक्रॉन कशा पध्दतीने मोजावे यासाठी जळगाव, नाशिकपासून थेट मुंबईपर्यंत मार्गदर्शन घेण्यात आले. अखेर पिशव्यांची एका बाजूची मोजणी केली जाते हे स्पष्ट झाल्यानंतर कंपनीला सायंकाळी ७ वाजता सील ठाेकण्यात आले. तसेच मालकाला १० हजारांचा दंड करण्यात आला.
महापालिका पथकाकडून सध्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्री व वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. १ ते ६ जून या सहा दिवसांत तीन कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी जप्त केलेला माल सील बंद गोडावूनमधून हलवण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने आयुक्त विद्या गायकवाड यांच्यासह अतिक्रमण व आराेग्याचे पथकाने पाहणी केली; परंतु माहितीत तथ्य नसल्याने पथकाने एमआयडीसीतील व्ही ११३ या ठिकाणी नेहा प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपनीत कारवाई केली.
मालकाने दिले आव्हान : मनपाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उत्पादित पिशव्यांची जाडी ही ५० मायक्रॉनपेक्षा कमी आहे; परंतु मालक पराग लुंकड यांनी पिशवीच्या एकाच बाजूची नव्हे तर दोन्ही बाजूची मोजणी करावी. तसाच नियम असल्याचे सांगत आव्हान दिले. त्यानंतर आयुक्तांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण केले. क्षेत्रीय अधिकारी मनीष महाजन व ताराचंद ठाकरे यांनी पिशव्यांची पाहणी करून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असल्याचे सांगत पिशवीचा एका भागाची जाडी ५० मायक्रॉनपेक्षा कमी नको असे स्पष्ट केले; परंतु मालक लुंकड हे ऐकायलाच तयार नव्हते. त्यानंतर जळगाव, नाशिक व मुंबईला फोन करून नियमांची खात्री करण्यात आली. त्यानंतर कंपनीला सील ठोकण्यात आले.
बाहेरून बंद आतमध्ये उत्पादन : यापूर्वी कारवाई केलेल्या ठिकाणांवर नेहा प्लास्टिक इंडस्ट्रिजमध्ये उत्पादित प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे त्याचा आधार घेत आयुक्त गायकवाड, आराेग्य विभागातील जितेंद्र किरंगे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय ठाकूर व पथकाने व्ही ११३ मधील कंपनीत धाड टाकण्यासाठी धाव घेतली; परंतु कंपनीचे दरवाजे बंद होते. प्रमुख गेटला आतून कुलूप होते. कंपनी जाणू बंद दिसत होती. मात्र, आतून उत्पादन सुरू होते.
...तर कंपनी मनपाच्या नावावर करू
पिशव्यांची जाडी मोजण्याच्या कारणावरून दोन तासांपेक्षा जास्त वेळ दोन्ही पक्षांमध्ये वाद चालला. दोघेही एकमेकांचे अज्ञान असल्याचा आरोप करत होते. यावेळी मालक यांनी तर थेट आयुक्त यांनाच मी चुकीचा ठरल्यास कंपनी मनपाच्या नावावर करेल, असे आव्हान दिल्याने अधिकारी अवाक् झाले. त्यात वेळ वाया गेला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.