आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ कारणावरून तरुणाला संपवले:दाेघे जखमी, नादुरुस्त माेबाईल पैसे देण्यावरून वादातून खून; महामार्गावरील दारू अड्डावर भरदुपारी थरार

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेबाईल खराब केला त्याचे पैसे देण्यावरून मित्राला मारहाण केली. ताे साेडवायला गेलेल्या 23 वर्षीय तरुणांवर चाॅपरने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास महामार्गालगत गणेशकाॅलनीतील दारु अड्ड्याजवळ ही थरारक घटना घडली. यात आणखी दाेघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अक्षय अजय चव्हाण (वय 23 ) असे मृताचे तर युवराज माेतीलाल जाधव (वय 18, बांधकाम मजुर, रा. जयभीम वाडा, पिंप्राळा) अशी जखमींची नावे आहेत. अक्षय जैन उद्याेग समुहात कंत्राटी कामगार होता. त्याच्या गणेश नामक मित्राला बाळा पवार याने माेबाईल खराब केला म्हणून मारहाण केली हाेती. त्याबद्दल विचारणा व वाद मिटविण्यासाठी गणेश काॅलनीतील महामार्गालगतच्या देशी दारुच्या अड्ड्यावर अक्षय गेला हाेता.

उभयंतात चर्चा झाल्यानंतर ते आपापल्या मार्गाने जात होते. त्यावेळी बाळा साेबत असलेल्या चारपाच जणांनी अचानक मारहाण सुरु केली. यात चाॅपरने अक्षयवर वार करण्यात आले. तसेच युवराज जाधव याच्या पाठीत वार केला. युवराजचा मिस्त्री काम करणारा मामा अमरसिंग चव्हाणच्या डाेक्यात दगड घालून जखमी केले.

उपचारापुर्वी गेला जीव

रक्तबंभाळ अवस्थेत अक्षय याला उपस्थितांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असता त्याचा मृत्यू झाला. दाेन्ही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अक्षयच्या भावाचा टाहाे...

अक्षयचा भाऊ शैलेश याला घटनेची माहिती मिळताच ताे मित्रासह जिल्हा रुग्णालयात पाेहचला. त्याने भावाचा मृतदेह पाहून एक हंबरडा फाेडला. घटनेतील संशयित व मृत हे दाेन्ही एकाच समाजाचे असल्याने समाजातील नागरिकांची माेठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी झाली हाेती. या प्रकरणी जिल्हा पेठ पाेलिसात गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती. जिल्हा रुग्णालयातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यासह शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस लगेचच हजर झाले.

बातम्या आणखी आहेत...