आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘सहा महिन्यांपूर्वी पाण्याच्या पाइपलाइनचे काम झाले. आता रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यास हरकत नाही’,असे लिखित स्वरूपात देऊन मनपाचे अभियंते पाइपलाइनवर व्हाॅल्व्ह टाकण्याचे विसरून गेल्याने दाेन महिन्यांपूर्वी बनवलेला गिरणा टाकी ते शासकीय इंजिनिअरिंग काॅलेज दरम्यानचा रस्ता खाेदावा लागला. तालुका पाेलिस ठाण्याच्या जवळील रस्ताही असाच खाेदला गेला आहे.
मंगळवारी काव्यरत्नावली ते महाबळ दरम्यानचा रस्ता खाेदण्यास सुरुवात झाली. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेने नागरिक हैराण झालेले असताना अमृत पाणीपुरवठा व भुयारी गटारींचे कारण पुढे करून स्वत:चा दाेष लपवून माेकळे हाेणारे महापालिकेचे अभियंते चक्क पाइपलाइनवर व्हाॅल्व्ह टाकणेच विसरले.
गेल्या आठवड्यात हे व्हाॅल्व्ह आल्यानंतर अधिकाऱ्यांना ते टाकण्याची उपरती झाली. गेल्या चार दिवसांपूर्वी गिरणा टाकी ते इंजिनिअरिंग काॅलेज दरम्यानच्या रस्त्यावर किमान चार ते पाच ठिकाणी व्हाॅल्व्ह टाकण्यासाठी दीड ते दाेन फूट व्यासाचे खड्डे खाेदले आहेत. गिरणा टाकी रस्ता व निमखेडी परिसरात व्हाॅल्व्हसाठी नव्या रस्त्यांवर केलेल्या खाेदकामामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किमान लाख ते दीड लाख रुपयांचा खर्च लागेल. रस्ता पुन्हा खाेदण्यास काेण जबाबदार? याबाबत महापालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संजय नेमाडे यांना विचारले असता, त्यांनी मक्तेदाराने व्हाॅल्व्हसाठी साेडलेले खड्डे बुजून टाकल्याने खाेदकाम करावे लागल्याचे सांगितले.
सार्वजनिक बांधकामचे पत्र
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली मक्तेदाराकडून शहरातील प्रमुख रस्ते बनवले जात आहेत. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेने त्या रस्त्यांवरील आनुषंगिक काम पूर्ण झाले आहे. रस्ता पूर्ण करण्यास हरकत नसल्याचे नाहरकत पत्र दिल्यानंतरही रस्ते खाेदकाम केले जात असल्याबाबत दाेन दिवसांपूर्वीच महापालिकेला पत्र दिले आहे. - गिरीश सूर्यवंशी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.