आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा केला खून:दाेघे गंभीर जखमी; जुन्या बसस्थानक परिसरातील घटना, मारेकरी शरण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या बसस्थानक परिसरात मंगळवारी सायंकाळी सात वाजता पूर्ववैमनस्यातून तीन तरुणांवर दोघांनी चाकूहल्ला केला. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. या घटनेनंतर मारेकरी शहर पोलिसांना शरण आला.आकाश सुरेश सपकाळे (वय २४, रा. कोळीपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सागर सुरेश सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघे जखमी आहे. मारेकरी अण्णा सैंदाणे (पूर्ण नाव माहीत नाही) हा पोलिसांना शरण आला आहे.

तर राजू सपकाळे (पूर्ण नाव माहीत नाही) हा दुसरा मारेकरी पसार झाला. घटना अशी की, मृत आकाशसह जखमी व मारेकरी असे सर्वजण जुने बसस्थानक परिसरातील एका पत्त्याच्या क्लबवर एकत्र आले. या दोन्ही गटांत पूर्वीपासून वैमनस्य आहे. यातच ते समोरासमोर आल्याने आपसात बाचाबाची सुरू झाली. क्षणार्धात त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. वाद वाढत असल्याने आकाश सपकाळे, सागर सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे क्लबवरून खाली उतरून रस्त्यावर धावत होते. अण्णा व राजू हे त्यांच्या मागून धावत येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न करीत होते.

अण्णानेे एका भेळच्या गाडीवरून चाकू हातात घेऊन तिघांवर सपासप वार केले. यात आकाशचा मृत्यू झाला तर सागर सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघे जखमी झाले. या घटनेनंतर अण्णा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. नागरिकांनी मृत आकाश व दोघी जखमींना जीएमसीत दाखल केले. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

‘अण्णा’चा मारहाण केल्याचा पाेलिस ठाण्यामध्ये दावा पोलिस ठाण्यात हजर झालेला अण्णा हा जखमी होता. आकाश व सागर हे मला मारहाण केली असल्याने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्याचे त्याने सुरुवातीला पोलिसांना सांगितले. दरम्यान, या हल्ल्यात आकाशचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...