आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा:उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश; जळगावातील 5827 शिवसैनिकांनी स्विकारले प्रतिज्ञापत्रे

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शिंदे सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका लागण्याचे भाकीत महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. या पार्श्वभूमीवर केव्हाही विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदार लता सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत न्यायालयात प्रकरण सुरू आहे. या मतदार संघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता सर्वस्वी न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. या मतदार संघासाठी उमेदवार शोधण्याच्याही सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बैठकीत केले वक्तव्य

मुंबईच्या सेना भवनात सोमवारी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची पक्षप्रमुख ठाकरे यांनी बैठक घेतली. बैठकीला खासदार विनायक राऊत, रवींद्र वायकर, रवींद्र मिर्लेकर, मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आदी उपस्थित होते. शिवसेनेची निशाणी मशाल आहे की आईस्क्रीमचा कोन? हे अंधेरी पोटनिवडणुकीने सिध्द केले. राज्यात शिवसेनेचे(उध्दव बाळासाहेब ठाकरे) वातावरण चांगले आहे. त्याचा फायदा उठवा. शेतकऱ्यांच्या व स्थानिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बूथ मॅनेजमेंटवर भर देवून शाखा विस्तार करावा. पाचोऱ्यात माजी आमदार आर.ओ.पाटील यांची पुण्याई कामाला येईल. चोपडा विधानसभेवरही लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना जळगाव लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

6 हजार शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्रे

जळगाव लोकसभा मतदार संघातून 6 हजार निष्ठावंत शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्रे पाठवण्यात आलेली होती. त्यापैकी 5 हजार 827 प्रतिज्ञापत्रे स्विकारण्यात आल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुखांनी केलेल्या सक्रीय सदस्य नोंदणीचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी 2 हजार 827 सक्रीय सदस्य केले तर हर्षल माने यांनी 3 हजार सक्रीय सदस्य केल्याची माहिती दिली.

या दिल्या सूचना

जळगावमधील सक्रीय सदस्य नोंदणी ही मनपाला पुरेल एवढीही नाही. किमान 7 हजार सक्रीय सदस्य नोंदणी पक्षनेतृत्वाला अपेक्षीत होती. पक्षातील कुरघोडीचे राजकारण, उणेदुणे काढणे बंद करुन संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत. बैठकीला सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानंदा पाटील, वैशाली सू्र्यवंशी, युवासेनेचे विराज कावडिया, निलेश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर रावेर लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

बातम्या आणखी आहेत...