आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईट:सीईटीच्या नियोजनशून्यतेमुळे विद्यापीठाचे कॅलेंडर विस्कळीत; व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटीचे आयोजन

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटीचे आयोजन करण्यात येते. या परीक्षांना सुरूवात झाली आहे. गेल्या चार ते पाच वर्षात सीईटीच्या नियोजनशून्यतेमुळे विद्यापीठाचे अकॅडमिक कॅलेंडर विस्कळीत झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सीईटी घेण्यात येत असल्याने प्रवेश प्रक्रिया संपून वर्ग सुरु होण्यास नोव्हेंबर महिना उजाडणार आहे. सेमिस्टर पॅटर्न असल्याने अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्याने विद्यार्थ्यांत नाराजी आहे.

बारावीचे निकाल लागताच विद्यापीठात बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी या पारंपारिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु होते. सध्या ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली सीईटी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिना अखेरीस ही परीक्षा संपणार आहे. १२ मे २०१५ रोजी राज्य सरकारने राज्यातील खासगी व्यावसायिक महाविद्यालयांतील प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीईटी सेलची स्थापना केली होती.

यापूर्वी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून हाताळली जात होती. मात्र, यात अनियमिततेच्या तक्रारी समोर आल्यानंतर प्रवेशाची जबाबदारी सीईटी कक्षाकडे सोपवण्यात आली. आता या सीईटी परीक्षांमुळे अभ्यासक्रमांचे शैक्षणिक कॅलेंडर विस्कळीत होत आहे. त्यामुळे विद्यार्थीही सीईटीत विशेष रस घेताना दिसत नाही. दरवर्षी सीईटीच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहे. याबाबत याेग्य ताे निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

अभ्यासाचे चुकतेय नियाेजन
नाेव्हेंबर महिन्यात वर्ग सुरु हाेत असल्याने पहिल्या सेमिस्टरच्या हिवाळी परीक्षांना फेब्रुवारी महिना उजाळताे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फक्त अडीच ते तीन महिन्याचा कालावधी मिळत असल्याने त्यांचे अभ्यासाचे नियाेजन चुकत आहे; परिणामी एटीकेटीचे प्रमाण वाढत आहे.

दरवर्षी पुरेसे प्रवेश नाही
सीईटीद्वारे दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांत ३ आणि ५ वर्षाचा एलएलबी अभ्यासक्रमाचा समावेश आहे. गेल्या वर्षी ३ वर्षाच्या एलएलबीसाठी ६८ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर केवळ १७ हजार ३५० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. तसेच ५ वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी २४ हजार ८८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ८ हजार ८५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बीएड, एम.एड यांसारख्या इतर अभ्यासक्रमांचीही अशीच स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...