आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:परसबागेत लाइटिंग, म्युझिक थेरपीचा केला वापर; चिरमाडे कुटुंबीयांचा उपक्रम

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अनेक ठिकाणी घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर विविध प्रकारची झाडे लावून परसबाग तयार करण्यात आली आहे. मात्र गणेशवाडी भागात राहणाऱ्या चिरमाडे कुटुंबीयांनी परसबागेत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून लाइटिंग विथ म्युझिक सिस्टिमही तयार केली आहे. साडेतीनशेहून अधिक झाडांना म्युझिक थेरपीद्वारे जिवंत ठेवण्याची युनिक आयडिया त्यांनी वापरली असून, त्यांची ही संकल्पना नागरिकांना आकर्षित करते आहे.

मनीष चिरमाडे यांनी लॉकडाऊनच्या काळात पूर्णवेळ झाडांची देखरेख केली. या काळात त्यांना झाडांची अधिकच आवड निर्माण झाल्याने आपल्या बागेला नवीन लूक देण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार लाइटिंग विथ म्युझिक थेरपीची संकल्पना वापरून त्यांनी निसर्गरम्य आणि युनिक परसबाग तयार केली. घराच्या पुढील मोकळ्या जागेत व गॅलरीत त्यांनी सुमारे साडेतीनशे कुंड्यांमध्ये विविध प्रकारची झाडे लावली आहेत तर जमिनीत ८ ते १० झाडे मोठी आहे. ही झाडे जगली तर पाहिजे शिवाय या बागेत मनही रमायला हवे याकरता सुरुवातीला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यास सुरुवात केली.

५० फुटांच्या पाइपला कट करून त्यात माती भरून शोच्या फुलांची झाडे लावली. यासोबतच घराच्या बाहेरील भिंतीलाही घरीच वारली पेंटिंगने डेकोरेट करण्यात आले आहे. यामुळे समोरील भाग हा आकर्षित झाला. लहान टोपल्या, पाइप, रिकाम्या बॉटल यामध्ये झाडे लावल्याने जागेचीही बचत झाली व टाकाऊ वस्तूंचा सदुपयोगही झाला. या सर्व वस्तू घरातीलच असल्याने खर्चदेखील आला नाही. कल्पकतेने बाग सजवणे शक्य झाले आहे.

जुन्या लाइटिंगचे आकर्षक डेकोरेशन
बागेत १० ठिकाणी रिकाम्या प्लास्टिक बॉटलमध्ये जुन्या लायटिंग दुरुस्त करून त्या लावण्यात आल्या आहे. यामुळे याठिकाणी रंगीबेरंगी असा प्रकाश बघायला मिळतो. अगदी सहज कोणीही घरी तयार करू शकेल अशा वस्तूंचा याठिकाणी वापर करण्यात आला आहे. तसेच म्युझिक हे मनात शांती देत असल्याने झाडांनाही आनंदी ठेवता यावे याकरिता एका स्टोन स्पीकरची घरीच निर्मिती करण्यात आली आहे. या स्पीकरमुळे संपूर्ण बागेत गाणे ऐकू येतात.

तुषार सिंचनाचीही व्यवस्था
झाडांना जिवंत ठेवण्यासाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जळगावात तापमान अधिक असल्याने मनीष यांनी ठिबक व तुषार सिंचनाची संपूर्ण घराला व्यवस्था केली आहे. यामुळे प्रत्येक झाडाला योग्य प्रमाणात बाराही महिने पाणी मिळू शकेल. यासोबतच गॅलरीत पूर्ण बांबूचे डेकोरेशन केले.

बातम्या आणखी आहेत...