आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला. त्यात मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी वंशिता सुनील अग्रवाल हिने ९५.८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. यासोबतच महाविद्यालयातीलच वाणिज्य शाखेचे यश संदीप खलसे व खुशी पारसमल मुणोत ९५.५० टक्के, कशिश दीपक वर्मा व करणवीर गुप्ता यांनी ९५.३३ टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे. हे पाचही विद्यार्थी सिटीचे टॉपर ठरले. जळगाव शहरात विज्ञान शाखेतून खेलेश पाटील ९०.६७ टक्के गुण मिळवत प्रथम आला. कला शाखेत सोहा खराटेने ९२.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
मुलाला जन्मतःच दृष्टी नसल्याने त्याचे दुःख न मानता त्याला आपल्या डोळ्यांनी सारे जग दाखवायचे, इतरांप्रमाणे शिकवायचे, मोठे करायचे व आपल्या पायावर उभे करायचे असे स्वप्न उराशी बाळगत मुनाफ शेख यांनी राहील शेख या आपल्याला मुलाला शिकवले. शिकण्याची जिद्द असल्याने राहीलने अभ्यास केला व बारावीच्या परीक्षेत ६८ टक्के मिळवले. राहील हा कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आहे. कोरोनानंतर अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नव्हते. मुले ऑनलाइनच्या दुनियेत रमली. मात्र, मूजे महाविद्यालयातील राहील मुनाफ शेख या दोन्ही डोळ्यांनी शंभर टक्के अंध असलेल्या विद्यार्थ्याने मात्र शिकण्याची जिद्द सोडली नाही. ऑनलाइन शिक्षणही घेतले. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ऑफलाइन शिक्षणासाठी नियमित वर्गात गेला. दृष्टी नाही म्हणून जीवनात अंधार आहे असा विचार न करता राहीलने इतरांप्रमाणे शिकण्याची जिद्द दाखवली. दहावीपर्यंतचे शिक्षण मेहरूण येथील मनपाच्या शाळेत घेतले. या ठिकाणी त्याने उर्दू माध्यमाचे शिक्षण घेतले. दहावी झाल्यानंतर पुढे आपण वेगळी वाट निवडायची असा निश्चय करून त्याने अकरावी कला शाखेत इंग्रजी माध्यमाला प्रवेश घेतला. इंग्रजी भाषेची भाती दूर करणे हा त्यामागील उद्देश होता. वडील मुनाफ शेख व आजोबा यांच्या सहकार्याने त्याने अभ्यास केला. इयत्ता बारावीला रायटरच्या मदतीने परीक्षा दिली व या परीक्षेत ६८ टक्के गुण मिळवले.त्याचे वडील मुनाफ शेख हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.