आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजार मूर्ती:बहुत खूब! लहान विक्रेत्यांचे नुकसान टाळण्यासाठी हजार मूर्ती घेतल्या विकत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा गणेशमूर्ती विक्रेत्यांची वाढलेली संख्या पाहाता सर्वांजवळच्या सर्व मूर्ती विकल्या जाण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे हे लहान लहान व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता आहे हे लक्षात येताच जळगावातील एक मोठ्या व्यावसायिकाने उर्वरित सर्व मूर्ती गुरूवारी विकत घेतल्या. त्यामुळे त्या लहान व्यावसायिकांना दिलासा तर मिळालाच; पण उरलेल्या मूर्तींची विटंबना होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे.

‘बहुत खूब!’ अशी दाद उत्स्फूर्तपणे दिली जावी, अशी ही कृती केली आहे शहरातील व्यावसायिक खुबचंद साहित्या यांनी. अचंबित करणारे निर्णय घेण्यासाठी माहिती असलेले हे व्यक्तिमत्व. त्यांनी घेतलेला हा निर्णयही आगळावेगळा आहे. पण यावेळी जळगावकरांना आश्चर्य वाटण्याऐवजी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक वाटते आहे. ‘मी एक व्यावसायिक आहे आणि व्यवसायात काय होते हे मला चांगले माहिती आहे,’ असे खुबचंद साहित्या ‘दिव्य मराठी’ला सांगत होते. ‘यंदा इतक्या मोठ्या संख्येने मूर्ती विक्रीच्या व्यवसायात उतरलेले लहान व्यावसायिक पाहून मला त्यांच्या भवितव्याविषयी चिंता वाटली. या सर्वांजवळच्या सर्व मूर्ती विकल्या जाणार नाहीत आणि अनेकांना त्याचा आर्थिक फटका बसू शकतो, हे माझ्या लक्षात आले. लहान व्यावसायिक ते सहन करू शकणार नाहीत, पण आपण ते सहन करू शकतो, असा विचार करून गुरुवारी सकाळी उर्वरित सर्व मूर्ती विकत घेण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी विकत दिल्या त्यांच्याकडून हजाराहून अधिक मूर्ती घेतल्या’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

या मूर्ती खान्देश मिल कंपाउंड परिसरातील संत बाबा हरदासराम मार्केटच्या हाॅलमध्ये मांडण्यात आल्या. तिथे गुरुवारी सायंकाळी रवि जोशी गुरुजी यांच्याकडून त्यांची विधिवत पूजा करवून घेण्यात आली. एकाच जागेत एकाच वेळी इतक्या मूर्तींची पूजा होण्याचा आणि एका गुरुजीकडून एकाच दिवशी इतक्या मूर्तींचे पूजन करण्याचाही हा कदाचित विक्रम असेल. शनिवारी सांयकाळी नदीच्या वाहत्या पाण्यात या मूर्तींचे विसर्जन करण्यात येईल. तोपर्यंत त्या दर्शनासाठी खुल्या असतील. विक्री न झालेल्या मूर्ती बऱ्याचदा जागेवरच सोडल्या जातात किंवा सोबत नेताना त्यापैकी अनेक मूर्ती भंगतात. त्यातून त्यांची विटंबना होण्याची शक्यता असते. ते टाळणे हा देखील खुबचंद साहित्या यांचा हेतू होता.

बातम्या आणखी आहेत...