आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेच्या (सिनेट) पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत १०पैकी तब्बल नऊ जागांवर विजय मिळवून विद्यापीठ विकास मंचने मागच्या निवडणुकीपेक्षाही एक जागा अधिक मिळवण्यात यश मिळवले आहे. नेहमीप्रमाणे विष्णू भंगाळे हे विरोधकांपैकी एकमेव उमेदवार अधिसभेवर निवडले गेले आहेत. गेले वर्षभर सुरू असलेली तयारी आणि मतदार नोंदणीत घेतलेला पुढाकार यामुळेच विद्यापीठ विकास मंचला हा विजय साध्य झाला, असे दिसते. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक एकत्रितपणे लढल्याने त्यांना अधिक जागा मिळतील, असा दावा केला जात होता.
मात्र, तो पोकळ होता हे गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. तीन पक्ष एकत्र असले तरी आपापसात समन्वय नसणे, ऐनवेळी उमेदवार निश्चित करून निवडणुकीला सामोरे जाणे, मतदार नोंदणीत अपेक्षित पुढाकार न घेणे ही महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे आहेत. या तीन पक्षांपैकी कोणत्याच पक्षाचे नेते निवडणुकीच्या प्रचारात आणि मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यात फारसे पुढे आले नाही. या उलट विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचेही आमदार, नगरसेवक कामाला लागले होते, असे चित्र दिसत होते. त्यातल्या त्यात शिवसेनेचे विष्णू भंगाळे काठावरच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांनीही गेले वर्षभर संपर्क वाढवला होता आणि मतदार नोंदणीसाठीही पुढाकार घेतला होता. त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. भंगाळेंच्या विजयावर चर्चा १९९८ पासून विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य असलेल्या विष्णू भंगाळे यांनी यंदाही विजय मिळवला आहे. ते एकटेच कसे निवडून येतात? असा प्रश्न त्यांच्याच मविआतील काही मंडळी निवडणुकीपूर्वीच विचारत होती. विद्यापीठ विकास मंचशी संधान साधून ते हा विजय हस्तगत करतात, अशीही टीका झाली. पण भंगाळे यांनी ती फेटाळून लावली होती.
मतमोजणीच्या वेळी सकाळपासून ते हरकती घेण्यात व सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यात आघाडीवर होते. मात्र, यंदाही ते एकटेच निवडून आले. तेही कमी मताधिक्याने. यात आपले नियोजन, इतक्या वर्षांचा संघर्ष, विद्यार्थ्यांसाठी सातत्याने घेत असलेली भूमिका आणि मतदार नोंदणीसाठी घेतलेली मेहनत यांचा महत्वाचा वाटा आहे, असे ते सांगतात. विद्यापीठ विकास मंचच्या विजयासाठी गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून काम करीत होते. मतदारांच्या नोंदणीपासून त्यांच्या भेटी घेण्यापर्यंत नियोजनबद्ध काम सुरू होते. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तीनही जिल्ह्यांचे एकूण ६८ भाग तयार केले गेले. या सर्व ठिकाणांवर सुमारे ७५० कार्यकर्ते धुरा सांभाळून होते. यामुळे विजय मिळवणे शक्य झाल्याचे विकास मंचचे प्रमुख सांगतात.
यंदा पहिल्यांदाच पदवीधर गटाच्या निवडणुकीपूर्वीच राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभेवरील आठ सदस्य जाहीर करण्यात आले. अप्रत्यक्षपणे हा शैक्षणिक संस्थाचालक आणि मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रकार होता. त्यामुळे असे निकाल समोर आले आहेत असा आरोप विष्णू भंगाळे यांनी निकालानंतर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.