आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या निवृत्तीचे पडसाद:जळगावात राष्ट्रवादीचा काम न करण्याचा इशारा, आमदारकीचा राजीनामा देणार : अनिल पाटील

प्रतिनिधी | जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याबाबत केलेल्या घोषणेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले आहेत. हा निर्णय मागे न घेतल्यास जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामे देतील. राष्ट्रवादीचे काम करणार नाही, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पवार यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीची वेळ घेणार आहेत. निर्णय मागे न घेतल्यास पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे सांगितले.

आमदारकीचा राजीनामा देणार : अनिल पाटील

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी केली आहे. त्यांनी निर्णय मागे न घेतल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आ. पाटील यांनी पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपल्या पक्षाच्या विचारधारेवर व आपल्या नावाच्या ताकदीवर विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आला. आपण घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासह लाखो कार्यकर्ते खचून गेले आहेत. आपण घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.