आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर कुसंुब्याजवळ रुग्णवाहिकेने उडवले:रुग्णालयातील पतीसाठी डबा नेणाऱ्या पत्नीचा मृत्यू

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पतीसाठी जेवणाचा डबा घेवून निघालेल्या ४८ वर्षिय महिलेचा रस्ता ओलांडत असताना रुग्णवाहिकेने जाेरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता शहराचा एन्ट्री पाॅइंट असलेल्या कुसुंबा गावात राज्य महामार्गावर घडली.

कुसुंबा (ता. जळगाव) येथील संगीता कैलास पाटील (वय ४८) यांचे पती कैलास यांना अर्धांगवायुचा त्रास आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा जेवणाचा डबा देण्यासाठी संगिता या सासू इंदूबाई यांना साेबत घेऊन घरून निघाल्या. कुसुंबा गावातील रिक्षा थांब्यावरून रिक्षात बसण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने (क्रमांक एमएच १९ सीवाय ७०९१) जोरदार धडक दिली. या धडकेत संगीताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. अपघातानंतर त्याच रुग्णवाहिकेतून संगीताबाई पाटील यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत संगिताबाई यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, सासू आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. संगिताबाई यांच्या पतीला अर्धांगवायुचा झटका येण्यासाेबत त्यांना ब्रेन हॅमरेजही झाल्याने चार दिवसांपूर्वीच खासगी रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.

पतीला दिली नाही माहिती संगिताबाई यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे पती कैलास यांना वैद्यकीय कारणासाठी देण्यात आलेली नाही. त्यांच्या अनुपस्थितीत शुक्रवारी संध्याकाळी कुसुंबा येथे मुलगा शुभमने अंत्यविधी केला.

बातम्या आणखी आहेत...