आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एकीकडे न्यूमाेनियाग्रस्त पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. तर दुसरीकडे पतीने गतिमंद मुलासह घरातच विषारी द्रव प्राशन करून अात्महत्या करून जीवन संपवले. जावई घरी अाल्यावर या घटनेचा उलगडा झाला. अादर्शनगरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अार्थिक परिस्थिती बेताची असल्याने खर्च परवडणारा नसल्याने याच विवंचनेतून त्यांनी हे टाेकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज अाप्तेष्टांनी वर्तवला अाहे.
दीपक रतीलाल सोनार (वय ६४) व परेश दीपक सोनार (वय ३५, रा. आदर्शनगर) असे मृत पिता-पुत्रांची नावे आहेत. शहरातील अादर्शनगरातील प्लाॅट क्रमांक १९०मध्ये दीपक सोनार यांच्या पत्नी श्रध्दा सोनार (वय ६०) यांना खासगी रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आले आहे. त्यांना न्यूमोनिया झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गुरुवारी त्यांची मुलगी रुपाली व जावई रुपेश सोनार यांनी रुग्णालयाचे दीड लाख रुपये बील जमा केले. आईची प्रकृती गंभीर असून त्यांना अजून काही दिवस रुग्णालयात ठेवावे लागेल. त्यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येईल, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. त्यावेळी दीपक सोनारही तेथे उपस्थित होते. रुपाली यांनी दुपारी त्यांना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर ते घरी गेले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जावई रुपेश सोनार हे सासऱ्याच्या आदर्शनगरातील घरी गेले. त्यांना सासरे व शालकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी आक्रोश केला. मुलगी रुपाली, बहिण रेशमा सोनार व इतर नातेवाईक रुग्णालयातून आदर्शनगरातील घरी आले. सर्व मृतदेह पाहून हादरले. मनपा स्थायी समिती सभापती राजंेद्र घुगे-पाटील यांनी या घटनेबाबत रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी आढळून आलेली नाही. श्रध्दा साेनार या सराफ बाजारात दागिन्यांना पॉलिश देण्याचे काम करतात. त्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. गतिमंद मुलाचाही सांभाळ त्यांनी केला. पती व मुलाचा मृत्यू झाल्याबाबत त्यांना माहिती नव्हते. रामानंद नगर पोलिसांनी त्यांच्या घराला कुलुप लावलेले आहे. या प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरे यांच्या माहितीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.