आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्याचा प्रताप:मालक, व्यवस्थापकाला अंधारात ठेवून 44 लाख रुपयांच्या खतांची परस्पर विक्री

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालकाला अंधारात ठेवून गोडाऊन किपरने शेतीशी संबंधित तब्बल ४४ लाख रुपये किमतीचे खते, बियाणे व किटकनाशके परस्पर दुकानदारांना विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पंकज नितीन पाटील (वय २५, रा. जगवाणीनगर), असे गोडाऊन किपरचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

एमआयडीसीतील एक्स ३२ सेक्टरमध्ये विजयकुमार सोमाणी यांच्या मालकीचे विजय ॲग्रो सेंटर नावाचे फर्म आहे. यात किटकनाशके, बियाणे व खते ऑर्डरप्रमाणे जिल्ह्यातील दुकानदारांना विक्री केली जाते. या फर्ममध्ये पंकज पाटील हा गोडावून किपर म्हणून कामाला होता. पंकज याने जून २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत सोनगीर नजीकच्या कांचनपूर येथील जयभोले हार्डवेअर ॲण्ड बी-बियाणे याचे मालक सागर पाटील यांना विक्री करुन लक्ष्मी ॲग्रो, अमळनेर या नावाने खोटा ऑर्डर फॉर्म तयार केले. २९ वेळा त्याने ४४ लाख ९८ हजार रुपये किमतीचा माल विक्री केला. कंपनीचे मॅनेजर नितीन कुळकर्णी २८ एप्रिल रोजी कामानिमित्ताने नाशिक येथे गेले असता दुसऱ्या दिवशी पंकज याने खासगी मालवाहू वाहन आणून दुकानदारांना पोहचविण्याच्या मालात १२ पेट्या जादाच्या भरल्या होत्या. हा प्रकार उघडकीस आल्यावर त्याने लक्ष्मीनारायण ॲग्रो, अमळनेर यांची ऑर्डर असल्याचे सेल्समन यांना सांगितले होते. ऑर्डर फॉर्मची विचारणा केल्यावर हरवल्याबाबत त्याने उत्तर दिले. कुळकर्णी यांनी जळगावात येऊन रेकॉर्ड तपासले असता वर्षभरात त्याने ४४ लाख ९८ हजार रुपयांचा माल परस्पर विक्री केल्याचे उघड झाले. या प्रकरणी कुळकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे व सचिन मुंढे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...