आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात तरुणी फोडणार दहीहंडी:युवाशक्ती फाऊंडेशचा सामाजिक उपक्रम, महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षीप्रमाणे यंदाही युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी काव्यरत्नावली चौक येथे सायंकाळी 6 वाजेपासून तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या आयोजनाचे हे 14 वे वर्ष असून यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजनाची तयारी सुरू आहे. डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मुलींचे गोविंदा पथक दहीहंडी फोडणार आहेत. या उपक्रमातून एक प्रकारचा सामाजिक संदेशही देण्याचा आयोजकांचा प्रयत्न असणार आहे. ​​​​​​

शिवतांडव प्रतिष्ठानचे 130 वादकांचे ढोल पथक, हायटेक लाईटस, बालगोपालांसाठी श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा, मल्लखांबचे थरारक प्रात्यक्षिक, सांस्कृतिक नृत्य हे या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. जळगाव जिल्ह्यात युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे तरूणींच्या गोविंदा पथकाची दहीहंडी आयोजित करण्यात येते. दहीहंडी सारख्या उत्सवात महिलांना मुख्य प्रवाहात आणून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणे हे या आयोजनामागील युवाशक्ती फाऊंडेशचा उद्देश आहे.

यांची विशेष उपस्थिती

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सिद्धीविनयक गणपती मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांसह शहरातील 10 उद्यमशील महिला उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनी सहभागी व्हावे

युवाशक्ती फाऊंडेशनचे 150 स्वयंसेवक विशेष गणवेशात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेणार आहेत. कोरोना काळानंतर प्रथमच शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आयोजन होत आहे. तरी जास्तीतजास्त जळगावकर नागरिकांनी या आयोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया व सचिव अमित जगताप यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...