आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Yuvasena Aims To Register 1 Lakh Voters For Senate Elections, Guardian Minister Asks Senate Member Vishnu Bhangale For Election Secrets | Marathi News

आखाडा:युवासेनेचे सिनेट निवडणुकांसाठी 1 लाख मतदार नोंदणीचे उद्दिष्ट, पालकमंत्र्यांनी सिनेट सदस्य विष्णू भंगाळेंना विचारली निवडणुकीची गुपिते

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या सिनेट निवडणुकांसाठी युवासेना सज्ज झाली आहे. ज्याप्रमाणे मुंबई विद्यापीठात १० पैकी १० जागा युवासेनेने निवडून दाखवल्या आहेत. आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही निवडणुकीसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यांत प्रत्येकी एक लाख मतदार नोंदणीचे उद्दिष्ट आहे. नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक विद्यापीठात सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्याद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी येथे नमूद केले.

आगामी काळात होणाऱ्या विद्यापीठ सिनेट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा नियोजन भवन येथे युवासेनेतर्फे निश्चय मेळावा घेण्यात आला. त्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव अविष्कार भुसे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, विस्तारक कुणाल दराडे, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, योगेश निमसे, विस्तारक किशोर भोसले आदी उपस्थित होते. प्रत्येक कार्यकर्त्याने पदवीधरांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी केले. महापौर जयश्री महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विराज कावडिया यांनी केले.

दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई
गेल्या वेळी युवासेनेने इतर विद्यापीठांकडे लक्ष दिले नव्हते. मात्र, यंदा सर्व विद्यापीठांत ताकदीने लढणार असल्याचे वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंगळवारी संभाजीनगर येथे मेळाव्यानंतर दोन कार्यकर्त्यांत झालेला वाद वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी संबंध नाही. तसे आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू असे सरदेसाई म्हणाले.

निवडून येण्याची गुपिते आम्हालाही सांगा : पालकमंत्री
मेळाव्यात निवडणुकीविषयी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांना सिनेटच्या पाच निवडणुका तुम्ही नेमक्या कशा जिंकल्या? त्याची गुपिते आम्हालाही सांगा असे म्हणत हास्याचे फवारे उडवले. ‘हा कलाकार माणूस. आधी राष्ट्रवादी काँग्रेस नंतर महाविकास आघाडीमधूनही निवडून आला. विष्णूभाऊ तुम्ही एरंडोली कशी करता? आधी एकचे दोन नंतर दोनचे तीन केले. आता दहा कसे करायचे. एका हाताने सांगितले तर आम्ही पण साथ देऊ की’ असे म्हणत पालकमंत्र्यांनी विजयाचे गुपितच विचारले. निवडणूक ताकदीने लढण्याचे संकेतही दिले.

बातम्या आणखी आहेत...