आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:1.86 कोटी भक्तांनी घेतले महालक्ष्मीचे लाइव्ह दर्शन, नित्योपचार पूजा, धार्मिक विधी पाहण्याची सुविधा

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिराचे दरवाजे बंद असले तरी लाइव्ह दर्शनाच्या माध्यमातून महालक्ष्मीचे दर्शन

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असलेले करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर कोरोनामुळे प्रथमच १३६ दिवसांपासून बंद आहे. प्रत्यक्ष दर्शनाचा योग येत नसल्याने दुरून का होईना परंतु देवीचे लोभस रूप डोळ्यात साठवण्याचा मोह भाविकांना अनावर होतोय. त्यामुळेच देवीच्या मंदिराचे दरवाजे बंद असले तरी लाइव्ह दर्शनाच्या माध्यमातून साडेचार महिन्यांत १ कोटी ८६ लाख ९८ हजार २९४ भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी लाइव्ह दर्शन अॅपची सुविधा देण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत लाइव्ह दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. पहाटेची काकड आरती, दुपारी होणारी आरती आणि शंखतीर्थ तसेच शेजारतीला नित्य मंदिरात हजेरी लावणाऱ्या भाविकांकडूनही सध्या लाइव्ह दर्शनावरच समाधान मानले जात आहे.

ऑगस्ट महिन्यात तरी मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होतील अशी आशा होती, पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर अजून काही दिवस बंदच राहणार असल्याचे देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. शासन आदेशानुसारच मंदिर दर्शन खुले केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अलंकार पूजेची भाविकांना प्रतीक्षा... : नित्यनियमाने सकाळी लवकर लाइव्ह दर्शन घेणाऱ्यांचा एक वर्ग आहे, तर दुपारी देवीची अलंकारपूजा बांधल्यानंतर तसेच आरतीच्या वेळेस दर्शन घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

महिना आणि लाइव्ह दर्शन घेतलेली भाविक संख्या
१८ मार्च ते ३१ मार्च २०२० - १८ लाख ०७ हजार १७१
१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२० - ३९ लाख ७५ हजार ६३२
१ मे ते ३१ मे २०२० - ४३ लाख ७३ हजार १०३
१ जून ते ३० जून २०२० - ४१ लाख ६८ हजार ६१७
१ जुलै ते ३१ जुलै २०२० - ४३ लाख ७३ हजार ७७१
१८ मार्चपासून मंदिर बंद आहे. तेव्हापासून ते ३१ जुलैअखेर प्रत्येक महिन्यात लाइव्ह दर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...