आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी चुरस दिसून आली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.०९ टक्के मतदान झाले. मतमोजणी १६ एप्रिल रोजी होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या जयश्री चंद्रकांत जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम या दोनच उमेदवारांत थेट लढत पाहायला मिळाली. पण सत्यजित कदम यांच्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची, तर जयश्री जाधव यांच्यासाठी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीने वेधले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे, आमदार ऋतुराज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह अनेक मान्यवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
३ मे रोजी नवी दिशा जाहीर करणार : खा. संभाजीराजे
कोल्हापूर- बराच विचार करून मी मतदान केले.... जवळपास तीस सेकंद विचार केला.... माझ्या खासदारकीची मुदत तीन मेपर्यंत संपतेय. त्या दिवशी मी माझी दिशा जाहीर करणार असून, ती निश्चितच वेगळी असेल, असे सूतोवाच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी कोल्हापुरात केले. त्यामुळे राजे नेमकी कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संभाजीराजे आता राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांच्यापैकी एखादा पक्ष निवडणार की, भाजपला जवळ करणार किंवा स्वतः एखाद्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार हे पाहावे लागेल. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपचा विजय निश्चित : आमदार चंद्रकांत पाटील
सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. मतदान करणाऱ्या मतदारांचे त्यांनी आभार मानले. तसेच काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाने नाहक त्रास दिला, असे सांगून नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी, सतेज पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे शुभेच्छा देऊन ऋतुराज यांची गळाभेट घेतली
मतदारांकडून चंद्रकांतदादांना हिमालयात जाण्याचा सल्ला
मंगळवार पेठेतील अहिल्यादेवी मतदान केंद्रावर पाटील यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाटील हे भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांसह मतदान केंद्रावर आले असताना मतदारांनी “जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणा देत आसमंत दुमदुमून टाकला. ‘दादा हिमालय गाठा’ अशा घोषणा दिल्या. नाराजी वाढत असल्याचे पाहून पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह गाडीत बसून तिथून निघून गेले.
भाजपला जनाधार नाही : सतेज पाटील
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज मंगळवारी कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. ‘भाजपला जनाधार नाही. यामुळे त्यांनी पैसे वाटले. पैशाने स्वाभिमान विकला जाणार नाही हे कोल्हापूरचे लोक दाखवून देतील,’ असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
29,1798 मतदारांनी हक्क बजावला 14,5768 पुरुष मतदार आहेत 14,6018 महिला मतदार, इतर १२
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.