आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:तेरा वर्षाच्या मुलासह आई-वडिलांची नदीत उडी टाकून आत्महत्या

कोल्हापूर9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूरातील पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील घटना, परिसरात हळहळ

पन्हाळा तालुक्यातील गोठे येथे पती-पत्नी यांनी तेरा वर्षाच्या मुलासह कुंभी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. दीपक शंकर पाटील (४० वर्षे), वैशाली दीपक पाटील (३५ वर्षे) व चि.विघ्नेश पाटील (१३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. जीवनात अपयश आल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. या घटनेने साऱ्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

यासंबंधी गावकरी व पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, दीपक पाटील हे गोठे येथील. शेतात राहावयास होते. गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दीपक पाटील, वैशाली पाटील व मुलगा विघ्नेश हे तिघे घरातून बाहेर पडले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी नदीत उडी टाकली. नदीत उडी घेण्यापूर्वी तिघांनी एकत्र दोरीने बांधून घेतल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या घराला बाहेरुन कडी असल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी दार उघडले. तेव्हा घरात त्यांना मोबाइलच्या खाली एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये 'जीवनात अपयशी ठरलो, आम्हाला माफ करा. कोणालाही जबाबदार धरू नये. स्वखुशीने आत्महत्या करत आहे 'अशी आशयाची चिठ्ठी सापडली.

चिठ्ठी वाचून गावकऱ्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. काही जणांना, कुंभी नदी पात्राजवळ त्या तिघांची चप्पले आढळली. गावकऱ्यांनी नदी पात्रात शोध मोहिम राबवली. शोधाशोध करताना त्या तिघांचे दोरीने बांधलेले मृतदेह आढळून आले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीपक पाटील यांची मुलगी साक्षी ही सध्या दहावीत शिकत आहे. ती आजोळी असल्याने याप्रसंगातून वाचली. दिपक पाटील यांनी मृत्यू पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुलीची आणि वडिलांची काळजी घ्यावी असेही लिहून ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...