आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्याचा अनोखा मान:कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तिरुपती तिरुमला देवस्थानाकडून शालू भेट!

कोल्हापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीस तिरुपती तिरुमला देवस्थान समितीच्या वतीने गुरुवारी (29 सप्टेंबर) मानाचा शालू अर्पण करण्यात आला. या शालूची किंमत 1 लाख 10 हजार रुपये आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरास आज सकाळी 11.00 वाजता तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डीजी व तिरुमला तिरुपती देवस्थान महाराष्ट्राचे विश्वस्त मिलिंद नार्वेकर व सौरभ वोरा यांनी भेट देऊन महालक्ष्मीला शालू अर्पण केला.

दसऱ्याचा मान

तिरुपती बालाजीचे विश्वस्त मिलिंद नार्वेकर आज देवीचा शालू घेऊन अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात दाखल झाले. नवरात्रोत्सवात दरवर्षी तिरूपती बालाजीकडून हा खास मानाचा शालू अंबाबाईसाठी पाठवला जातो. दसऱ्याच्या दिवशी हा शालू देवीला परिधान केला जातो. यंदा शालू अपर्ण करण्यासाठी मान मिलिंद नार्वेकरांना मिळाला. दसऱ्याच्या दिवशी देवीला शालू परिधान केल्यानंतर त्याचा लिलाव देखील करण्यात येतो.

लाखो भाविक

कोल्हापुरात पहिल्या तीनच दिवसांत अडीच लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. कोरोनापूर्व काळात सुमारे 18 ते 20 लाख लोकांनी दर्शन घेतले होते. कोरोनामुळे 2 वर्षांत भाविकांची संख्या रोडावली होती. परिसरात फुले विक्रीची 34 दुकाने असून 9 दिवसांत हार-फुले विक्रीतून पाऊण कोटीची उलाढाल होईल. ओटी प्रसाद व कुंकू विक्रीची 60 दुकाने आहेत. साडी, ओटी, प्रसाद, कुंकू, देवीच्या प्रतिमेची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

1700 ते 1800 वर्षे प्राचीन मंदिर

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे 1700 ते 1800 वर्षे जुने आहे. मंदिराची रचना तारकाकृती असून भोवताली शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचा पहिला उल्लेख संजान (ठाणे) येथे सापडलेल्या इ. स. 871 च्या ताम्रपटात आहे. राजा अमोघवर्षने डाव्या हाताची करंगळी श्री महालक्ष्मीला अर्पण केली, असा उल्लेख आहे. यावरून 7 व्या शतकापासून या मंदिराच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात.