आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी उद्योग समूहाच्या घोटाळ्याची आरबीआय, सेबीने चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
अदानीला विनातारण कर्ज दिले
तसेच, अदानी उद्योग समुहास एसबीआय आणि एलआयसीने विनातारण कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. या वित्तीय संस्थांमधील सर्वसामान्यांचा पैसा परत मिळण्यासाठी सोमवारी (दि. ६) कॉंग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती पृथ्वीराज यांनी दिली.
केंद्राकडून अदानीला मदत
'हात से हात जोडो' अभियानाचा प्रारंभ सातारा काँग्रेस भवनात झाला. त्यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्टेट बँक ऑफ इंडिया व भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत अदानींना मोठ्या प्रमाणात विनातारण कर्ज देण्यात आलेले आहे. मोठा घोटाळा उघडकीस आल्याने स्टेट बँक व एलआयसीमधील सर्वसामान्यांचा पैसा असुरक्षित झाला आहे. तरी देखील केंद्र सरकार विविध मार्गाने अदानीला मदत करण्याचा खटाटोप सुरू आहे.
जगातील सर्वात मोठा घोटाळा
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे. हा अर्थसंकल्प फसवा आणि भ्रमनिराश करणारा असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. जगातील सर्वात मोठा घोटाळा होवूनही अदानी स्वत:चा बचाव करताना दिसत नाहीत. परंतु, केंद्रातील मंत्री अदानींच्या बचावासाठी सरसावले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी या वित्तीय संस्थांमधील सर्वसामान्यांचा पैसा परत मिळण्यासाठी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करणार असल्याचे पृथ्यवीराज चव्हाण यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यातील घटनाबाह्य सरकार टिकण्याची शाश्वती नसल्यानेच मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या वावड्या उठल्या आहेत. परंतु, अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
आगामी निवडणूक मविआच जिंकणार
सर्वच पोटनिवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढली. त्या ठिकाणी भाजपचा धुव्वा उडाला आहे. त्यामुळे आपले सरकार टिकेल का?, याची शाश्वती नसल्यामुळे शिंदे सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. रोज दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तर आमचा विजय हा निश्चित असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
विरोधकांना मदत केली नाही
आमदारकीचा अनुभव नसताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यामुळेच आमच्यात समन्वय कमी झाला. पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांना मदतही केली, असा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला होता. त्याला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी दिल्लीतून राज्यात आलो आणि आमदार म्हणून काम केले, हे खरे आहे. पण कोणत्याही विरोधकाला मदत केली नाही. मला अनुभव जरी नसला तरी राज्याच्या हिताचे चांगले निर्णय त्यावेळी घेतले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
संबंधीत वृत्त
संजय राऊतांचा खळबळजनक दावा:अदानींवरील हल्ला हा भाजपच्या 'रिझर्व्ह बँके'वर हल्ला, भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच हल्ला
भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदानींवर हल्ला झाला. अदानींवरील हल्ला हा भाजपच्या ‘रिझर्व्ह बँके’वर हल्ला आहे, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.