आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे-मुंबईला जाणारे दुध रोखण्याचा प्रयत्न:मराठा आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाजाचे गोकुळ दूध संघासमोर आक्रमक आंदोलन

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

सकल मराठा समाजाकडून आज कोल्हापूरातून मुंबई-पुण्याला जाणारे दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गोकुळ शिरगाव मधील गोकुळ दूध संघाच्या दारातच ठिय्या मारला. मराठा आंदोलकांच्या या पवित्र्याला विरोध करताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास, महाराष्ट्रभर याचा उद्रेक होईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. दरम्यान यावेळी पोलिसांनी आंदोलकांच्या इशाऱ्याला न जुमानता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आज पश्चिम महाराष्ट्रातून पुणे मुंबईला जाणारे दूध रोखणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला होता. त्यानुसार गोकुळ दूध संघाबाहेर सकाळपासून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी दहाच्या सुमारास आंदोलनकर्ते मोर्चाने गोकुळ दूध संघाकडे आले. यावेळी 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा देत आंदोलन कर्त्यांनी गोकुळ दूध संघात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना संघाच्या गेटवरच अडवण्यात आले. त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी गेटवरच ठिय्या मारत, राज्य सरकारचा निषेध केला.

आरक्षणाचा निर्णय घेण्यास अपयशी ठरलेल्या राज्यसरकाराचा येत्या मंगळवारी श्राद्ध घालणार असल्याचे, आंदोलन कर्त्यांनी सांगितले. तसेच राज्यसरकारने जम्बो पोलीस भरती जाहीर केली आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय भरती न करता जाहीर केलेली मेघाभरती थांबवावी, अशी मागणीही मराठा संघटनांनी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत आंदोलकांना ताब्यात घेतले.