आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असताना पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत त्यांनी थेट राजकीय पवित्रा घेतला आणि केंद्रानेच ही मदत दिली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. याच वेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचे नावही घेतले नाही. त्यांच्या या भूमिकेने राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील दरी अधिकच रुंदावत असल्याची प्रचिती पुन्हा आली.
हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट जारी केल्यानंतर पाटबंधारेमंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांची बंगळुरूला भेट घेत कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याबाबत सूचना केल्याने महापुराचा तडाखा हा कृष्णा-वारणा नदीच्या खोऱ्यात जाणवला. पण अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने विध्वंस टाळण्यात यश आले. मुख्यमंत्र्यांनीही सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत दौरे करून पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे, अशी भूमिका विशद केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना मदत मिळण्यास सुरुवातही झाली आहे. परंतु या बाबीकडे राज्यपालांचे लक्षच गेले नाही. उलट त्यांनी मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळवू द्यावा, असाच मुद्दा उपस्थित केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
सय्यद यांच्या ट्रस्टकडून १ हजार मुलींना ५० हजार
अभिनेत्री दीपाली सय्यद-भोसले यांनी आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबातील एक हजार मुलींना ५० हजार रुपयांपर्यंतची मदत ठेव स्वरूपात देण्याच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह बोलत होते. दीपाली सय्यद यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने करावा, असेही ते म्हणाले. आपत्तीच्या काळात निसर्ग सर्वांचीच परीक्षा घेत असतो. या काळात केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घ्यायला हवा तरच युवा पिढीला आत्मनिर्भर करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यात यश प्राप्त होईल. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती होती. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चित्रफीत संवादाद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.