आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील भारतीय जनता पक्षाच्या ‘कुटिल’ राजकारणाला नेस्तनाबूत करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळाले पाहिजे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी करून अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नव्या आघाडीबाबत इशाराही दिला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्क दौऱ्यासाठी गेले दोन दिवस संजय राऊत हे सांगली व कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी सांगलीतील आयकॉन हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी एकसंध राहिली आणि भाजपच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. तर चिंचवड मतदारसंघात वंचितने राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी तब्बल ४४ हजार ११२ मते मिळवली. भाजपच्या अश्विनी जगताआंकडून राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल काटे यांना पराभव स्वीकारावा लागला. हे राजकीय गणित महाविकास आघीडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अभ्यासले पाहिजे, असे सांगून प्रकाश आंबेडकरांचे आणि दोन्ही काँग्रेसचे काही मतभेद आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडीत वंचितला स्थान मिळाले पाहिजे, असा अप्रत्यक्ष इशाराच राऊत यांनी दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाने लाेकांच्या मताचा विचार न करता राजसत्तेला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मान्यता काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. परंतु सध्या तातडीने निवडणुका घेतल्या तरीही शिवसेनेला सव्वाशे ते दीडशे जागा मिळतील आणि तेव्हाच जनतेच्या मनातील खरी शिवसेना सध्याच्या राज्यकर्त्यांना समजेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला. भाजपच्या दगाबाजीच्या राजकारणाने आमच्या ४० मिंध्या आमदारांच्या साथीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण आमच्यावर करण्यात आलेला हा वार पाठीवर आहे. महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत सध्याच्या सरकारवर समोरून वार करेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, दुसरीकडे संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र साेडले आहे. तसेच त्यांच्यावर हक्कभंग आणण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रकरणही येत्या काही दिवसांत आणखी तापण्याची शक्यता आहे.
धैर्यशील मानेंनी टॅगलाइन बदलून आता ‘मीच गद्दार’ करावी मागच्या दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शहरांत सभा घेतल्या. धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीका केली. गद्दार खासदार म्हणत त्यांनी इचलकरंजी येथे माने यांना थेट आव्हान दिले. धैर्यशील मानेंनी ‘मीच खासदार’ टॅगलाइन बदलून आता ‘मीच गद्दार’ करावी, “यांचे नाव धैर्यशील कुणी ठेवले? यांना कुठेच धैर्य नसते. कदाचित त्यांना भाजपही तिकीट देणार नाही. खोकेपटूंमधील हाही मोठा खेळाडू आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. मूळ शिवसेना ही जनमानसाची आहे. बाहेर गेलेले गद्दार महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. त्यांच्या पुढील पिढ्यांनाही गद्दार म्हणून कायम कपाळावर कलंक राहणार आहे. जनताच त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल. आता तुम्हीच त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असेही राऊत या वेळी म्हणाले. या वेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.