आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘जुनी पेन्शन न देणाऱ्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची..’, ‘सरकारला आलंय टेन्शन, द्यावी लागेल जुनी पेन्शन...’ शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढत शनिवारी सरकारला जागे करण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केला. उन्हाच्या तडाख्यात ५० हजारांवर सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. यानंतर आता राज्यभर मोर्चे काढू, असा निर्धार या वेळी सर्वांनी केला.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गेली अनेक वर्षे शासकीय-निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांचा लढा सुरू आहे. त्यासाठी १४ मार्चपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, महापालिका कर्मचारी समन्वय समिती व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. या वेळी आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
कोल्हापूर शिवाजी पेठेतील गांधी मैदानातून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. “एकच मिशन जुनी पेन्शन’ लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या व पांढरी वेशभूषा करून कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या मार्गाला लागून असलेल्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे भाषणे झाली.
ज्यांना आम्ही गादीवर बसवलं त्यांनीच रस्त्यावर आणलं मोर्चात सहभागी झालेल्यांनी हाती घेतलेले फलक खूपच लक्षवेधी होते. प्रत्येक फलकावरील वाक्यात वास्तव होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आता रस्त्यावर लढाई सुरू झाली आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. जो देईल जुनी पेन्शनला साद, त्यालाच असेल आमची साथ.. कोई तो निकालो इसका हल, बिना पेन्शन कैसे बितेगा कल... जुन्या पेन्शनचा वाद नका वाढवू, नाही तर आम्ही सत्तेतून घालवू, ज्यांना आम्ही गादीवर बसवलं त्यांनीच आम्हाला रस्त्यावर आणलं...नका करू जुन्या पेन्शनची बेरीज नाही तर आणू सत्ताधाऱ्यांना जेरीस. अशा अाशयाचे फलक मोर्चातील लाेकांच्या हातात होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.