आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दार उघड उद्धवा दार उघड:राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरासमोर घंटानाद आंदोलन

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरीला बंदिस्त करून राज्य सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे, भाजपची टीका

महाराष्ट्रातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे दर्शनासाठी भक्तांना खुली करावीत, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन झाले. त्याअंतर्गत कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारातही घंटानाद आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत् करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, दारुची दुकाने 'पूनःश्च हरी ओम' च्या नावाखाली सर्व काही चालू केले. लहान-मोठी व्यापाऱ्यांची दुकाने, केश कर्तनालये इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी लोकांची भाजी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते अशी मंडई देखील सुरू झाली आहे. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात 'हरी' ला मात्र बंदिस्त ठेवले आहे.

गेली पाच महिने मंदिरे बंद असल्यामुळे अनेक लोकांची मानसिकता बिघडली आहे. मंदिरामध्ये येणारा भाविक हा स्वतः सुचिर्भीत होऊनच म्हणजे हात पाय स्वच्छ धुऊन स्वच्छतेचे भान ठेवूनच मंदिरामध्ये प्रवेश करत असतो. मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा विचार सरकार करणार आहे की नाही? संतभूमी महाराष्ट्रात मद्य विक्री सुरू आहे आणि भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल दाखल होत आहेत. भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा राज्य सरकारचा कारभार सुरू आहे.

महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होते आहे. केंद्र सरकारनेही 4 जून 2020 रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांतून होत आहे. मात्र हरीलाच बंदिस्त करून राज्य सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे.

सामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी. या मागणीकडे निद्रिस्त राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे भाजपने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.