आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संपूर्ण भारत वर्षात मोदी नावाचा एक मोठा दरारा निर्माण झाला असतानाच आटपाडी तालुक्यातील एका शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारातही याचा करिष्मा पाहायला मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शेतकरी बाबूराव मिटकरी यांच्या ‘मोदी’ बकऱ्याला तब्बल ७० लाख रुपयांची मागणी झाली. परंतु अपेक्षेपेक्षा ती खूपच कमी आहे, असे कारण सांगून या बकऱ्याची विक्री करण्यात आली नाही. हा “मोदी’ बकरा किमान १ कोटी ५० लाख रुपयांना विकण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला.
आटपाडी येथील उत्तेश्वर देवाची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द झाली. या यात्रेत पश्चिम महाराष्ट्रातील शेळ्या-मेंढ्यांचा मोठा बाजार भरतो. त्याला बाधा येऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी शासनदरबारी विनंत्या केल्यानंतर रविवार आणि सोमवारी हा बाजार भरवण्यास मान्यता मिळली. रविवारी पहिल्या दिवशी शेळ्या-मेंढ्यांचा भरगच्च बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि विजापूर येथून शेकडो मेंढपाळ जातिवंत बकरे आणि मेंढ्या विक्रीसाठी घेऊन आले होते. परंतु गेले दोन दिवस चर्चा केवळ ‘मोदी’ बकऱ्याचीच होती. त्याला खरेदी करण्यासाठी काही इच्छुक तयारही होते. मिटकरी यांचा बकरा त्यांनी ७० लाखांची ऑफर असतानाही त्यांनी या बकऱ्याची किंमत दीड कोटी रुपये सांगितल्याने हा व्यवहार पूर्ण झाला नाही.
सात महिन्यांच्या मेंढीलाही १३ लाखांची बोली
मोदी बकऱ्याचा वंश असलेल्या सात महिन्यांच्या मेंढीलाही तब्बल १३ लाखांची मागणी आली. बकरा मालक मिटकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभर नाव मिळवले आहे. ते आमचे आदर्श आहेत. त्यामुळे या जातिवंत बकऱ्यालाही मी मोदी यांचे नाव दिले आहे. हा बकराही मोठा नावलौकिक मिळवत आहे. तो आपला जीव की प्राण आहे. जतच्या व्यापाऱ्याने ७० लाख रुपयांपर्यंत या बकऱ्याची मागणी केली आहे. याच्यापासून होणाऱ्या पिल्लांची १० ते १५ लाखांपर्यंत मागणी असते. जातिवंत बकरे कापण्यासाठी नाही तर प्रजोत्पादनासाठी उपयोगात आणले जातात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.