आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. ते आज कोल्हापूरला येणार होते. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात आदेश जारी केला होता आणि 20 आणि 21 सप्टेंबर रोजी जमाव जमा होऊ नये यासाठी कलम 144 लावले होते. त्यांना कराड येथील गव्हर्नर सर्किट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर काही तासांनी त्यांना सोडून देण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार पहाटे पावणे पाच वाजता माजी खासदार किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कराड येथे उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
काय आहे प्रकरण
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी करत जमावबंदीचे आदेश जारी केले होते.
मुश्रीफ यांची ईडीकडे तक्रार करणार
13 सप्टेंबर रोजी सोमय्या म्हणाले होते की, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने 127 कोटी रुपयांचे व्यवहार मनी लॉन्ड्रिंग, हवाला व्यवहार आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून केले आहेत. हसन मुश्रीफ सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. सोमय्या म्हणाले की, ते ईडीमध्ये मुश्रीफ यांची तक्रार करणार आहेत.
'हा घोटाळा मोठा असू शकतो'
सोमय्या म्हणाले होते की, मुश्रीफ यांची पत्नी साहिरा हसन मुश्रीफ यांच्या नावे संताजी घोरपडे शुगर मिलमध्ये 3 लाख 78 हजार शेअर्स दाखवण्यात आले आहेत. मुश्रीफवर सीआरएम सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या शेल कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ कुटुंबावर आयकर छापे टाकण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.