आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध आंदोलन:भाजपचे आजचे दुध दरवाढीचे आंदोलन अस्तित्व दाखवण्यासाठी केलेला स्टंट, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची जोरदार टीका

कोल्हापूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
सतेज पाटील - फाइल फोटो - Divya Marathi
सतेज पाटील - फाइल फोटो
  • व्यापाऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने निर्णय घ्यायचा आणि त्याचा भुर्दंड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोसायचा हा कुठला न्याय?

भाजपने आंदोलन करण्याऐवजी राज्यातील दुध उत्पादकांसाठी केंद्र शासनाकडून काय मदत करणार हे पहिल्यांदा जाहीर करावे. यापूर्वी केंद्र शासनाने 10 हजार टन दुध पावडर आयात केली. त्यावेळी भाजपने दुध उत्पादकांचा विचार का केला नाही. व्यापाऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने निर्णय घ्यायचा आणि त्याचा भुर्दंड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोसायचा हा कुठला न्याय? असा सवाल गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपच्या आंदोलनावर उपस्थित केला.

भाजपचे आजचे दुध दरवाढीचे आंदोलन अस्तित्व दाखवण्यासाठी म्हणून केलेला स्टंट आहे असा आरोप करुन पाटील म्हणाले, राज्य शासन म्हणून आम्हाला जे करायचे ते करणार आहोतच. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री सुनिल केदार, मंत्री जयंत पाटील यांच्यासह बैठक झाली आहे. राज्य शासन दुध उत्पादकांना मदत करणार यात शंका नाही. परंतु भाजपने आत्मचिंतन करावे. भाजपच्या ताब्यातील दुध संघांनी पहिल्यांदा पाच रुपये दरवाढ देण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान त्यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक धनंजय महाडिक यांच्या महाडिक कुटुंबीयांच्या ताब्यातील दुध संघाला दिले.

चंद्रकांत पाटील पुण्याचे म्हणूनच त्यांचे आंदोलन पुण्यात...

मुळचे कोल्हापूरचे असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आंदोलन केले असल्याच्या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले, ते पुण्याचे असल्याने त्यांनी पुण्यात आंदोलन केले. आठवड्यातून एकदा चंद्रकांत पाटील सुट्टीसाठी कोल्हापूरात येतात. गेल्यावेळी त्यांची आंदोलनाची तारीख व सुट्टी एकाच दिवशी आल्याने त्यांनी कोल्हापूरात आंदोलन केले होते, असा टोलाही लगावला.