आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लढा सीमाभागाचा:कर्नाटक सरकारची दडपशाही झुगारून बेळगावात मराठी भाषिकांचा काळा दिन; आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपचा पाठिंबा

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मराठा मंदिरकडे जाणारे रस्ते बंद करून कर्नाटक पोलिसांनी दडपशाही सुरू होती.
  • 40 लाख मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घ्या, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची मागणी
  • कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याला मुश्रीफ, सामंत यांची सडेतोड उत्तरे

कानडी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आणि कर्नाटक सरकारची दडपशाही झुगारून देत बेळगावातील मराठी भाषिकांनी रविवारी ‘काळा दिन’ पाळला. बेळगावातील मराठा मंदिर सभागृहात मेळावा घेण्यासही येदियुरप्पा सरकारने रोखले होते, परंतु शेकडो मराठी भाषिकांनी मराठा मंदिरात आंदोलन यशस्वी केले. या वेळी बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील ८६५ गावांचा समावेश संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी सभागृह दणाणले.

भाषावार प्रांतरचनेत सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ कर्नाटक स्थापनादिनी १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिक जनतेच्या वतीने काळा दिन पाळण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही कार्यक्रमाला बंदी असल्यामुळे मराठा मंदिर येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण बेळगाव जिल्ह्याला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. यावेळी कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अांदोलन स्थळावर गोंधळ घातला. महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. काळा दिनानिमित्त आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी काळ्या फिती लावून काम केले.

आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपचा पाठिंबा

आंदोलनास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र भाजपने जाहीर पाठिंबा दिला होता. रविवारी बेळगावातील मराठा आंदोलनात समितीच्या ज्येष्ठ नेत्यांसह सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होत्या.

तोपर्यंत संग्राम थांबणार नाही : अजित पवार

बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे. मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याला मुश्रीफ, सामंत यांची सडेतोड उत्तरे

बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सूर्य-चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही, असे बेताल वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शनिवारी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. चंद्र-सूर्याचे कशाला घेऊन बसलात? तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल, असा टोला राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. तर कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला आजमावू नये, असा इशारा उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला.

४० लाख मराठी जनतेला महाराष्ट्रात सामावून घ्या

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे. कर्नाटक सरकार मोठ्या प्रमाणात दडपशाही करत आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणामध्ये लक्ष घालून सीमाभागातील ४० लाख मराठी भाषिक जनतेला महाराष्ट्रात सामावून घ्यावे, अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी केली आहे