आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी सीबीआयचे छापे:सीबीआयचे अधिकारी कागदपत्रे घेऊन घरी गेले : जयंत पाटील

सांगली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यासाठी गेलेले सीबीआय अधिकारी सोबत कागदपत्रे घेऊन घरात गेले, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. या धाडीमध्ये सीबीआयने काेणती कागदपत्रे जप्त केली याचा तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. एका महिला याचिकाकर्त्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, ठाकरे सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार याचा उपयोग करून घेत आहे.

देशमुखांविरोधात थेट गुन्हा दाखल करणे अत्यंत गैर असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आजच्या धाडीच्या वेळी कोणकोणती गैरकृत्ये आणि त्यांच्याशी संबंधित असणारे कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत याचा खुलासा करणे अत्यंत गरजेचे आहे. स्फोटके प्रकरणात ज्या पोलिस अधिकाऱ्याला (सचिन वाझे) पोलिस कोठडीत असलेल्या आणि या प्रकरणात पदावरून दूर करण्यात आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने (परमबीरसिंग) केलेल्या आरोपांवरून गृहमंत्र्यांची चौकशी आणि त्यानंतर सीबीआयचा लागलेला ससेमिरा हा सारा प्रकार अनाकलनीय आहे. सीबीआयकडे हे प्रकरण हस्तांतरित केल्यानंतर न्यायालयाची आब राखण्यासाठी अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा दिला होता. अशा परिस्थितीत या धाडी समर्थनीय ठरत नाहीत. सीबीआयने याप्रकरणी जो प्राथमिक तपास केला त्याची माहिती न्यायालयासमोर मांडणे गरजेचे आहे. तसेच या अहवालाबाबतची माहिती राज्य शासनाच्या सरकारी वकिलांनाही दिली पाहिजे, या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह पाच जणांची चौकशी करण्यात येत आहे, असे सांगितले गेले. यावरूनच सीबीआय हे सारे प्रकरण केवळ देशमुखांचे चारित्र्यहनन करण्यासाठीच करीत आहे, असे परखड मतही जयंत पाटील यांनी शेवटी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...