आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात. पाटलांनी पुन्हा एकदा देशाच्या राजकारणावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. "ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत.
देशाच्या राजकारणात जायचे असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावे लागते. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत." अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. पाटील मंगळवारी सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. त्यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
शरद पवार नेहमीच पंतप्रधान होत असतात
शिवसेना खासदार संजय राउत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला निघालेत. तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात. असे म्हणत पाटलांनी शरद पवारांना टोमणा मारला.
फलटण तालुका आणि शहराच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी घेतलेल्या या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका केली. यावेळी भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, अनुप शहा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.
संजय राउत डबल ढोलकी
शिवसेना खासदार संजय राउत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
सत्तेसाठी काहीही करायला तयार
सत्तेची खूर्ची टिकवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. ममता बनर्जी यांनी युपीए कुठे आहे असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी संजय राउत त्यांच्या बाजूला होते. राहुल गांधी वर्षाचे सगळे दिवस परदेशात असतात, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर यावर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतून डोळे वटारले असतील त्यामुळे लगेच त्यांची समजुत घालायला संजय राउत गेले असतील अशी जहरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. संजय राउत यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवरून देखील चंद्रकांत पाटील यांनी संजय राउत यांच्यावर निशाणा साधला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.