आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:मुख्यमंत्री ठाकरे सांगलीत आले, पूरग्रस्तांना भेटले अन् ठोस आश्वासन न देताच निघून गेले

सांगली / गणेश जोशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापुरासंदर्भात पूर रेषेचे तंतोतंत पालन केले जाईल : मुख्यमंत्री

कृष्णा व वारणा काठावरील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी दोन वेळेस आयोजित सांगली जिल्ह्याचा दौरा महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केला. ही भेट म्हणजे मुख्यमंत्री आले...त्यांनी दुरूनच सर्व काही पाहीले आणि कोणतेही ठोस आश्वासन न देता ते परतले. थोडक्यात पुराच्या पाण्याचा जबरदस्त तडाखा बसलेल्या नागरिकांच्या नयनांतील अश्रू न पुसता व त्यांच्या चेहऱ्यावर अल्हादाची लकिरे न उमटताच ते परतले. लाखो महापूरग्रस्तांना दिलासा तर सोडाच पण आश्‍वासनेही दिली नाहीत. त्यामुळे पूरग्रस्तांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक वेळेला ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी आश्‍वासक जबाबदारी स्वीकारली होती. महापुरातही ते कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारतील, अशी आशा होती. परंतु त्यांनी पूरग्रस्तांशी थेट भेट घेण्यापेक्षा गावातील आघाडीच्या विविध राजकीय नेत्यांशीच अधिक चर्चा केली. पूरग्रस्तांची दु:खे नेमकी काय आहेत. २००५, २०१९ आणि २०२१ साली या महापुरामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे जीवन उद्ध्वस्त कसे झाले आहे. सांगली जिल्ह्याच्या या दौऱ्याची सुरुवात तासगाव तालुक्यात भिलवडी येथून झाली. त्यानंतर ते अंकलखोप, कसबे डिग्रज आदी गावांच्या भेटीनंतर ते सांगलीत आले. शहरातील व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी ते हरभट रोड येथे काही काळ थांबले. परंतु व्यापाऱ्यांनी पूरग्रस्त व्यावसायिकांचे निवेदन त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते नाकारण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शिवसैनिक व भाजपच्या कार्यकर्त्यांत जोरदार धक्काबुक्कीही झाली.

पूर ओसरल्यानंतर सहा दिवसांनी दौरा; तासगाव, भिलवडीला भेट
महापूर ओसरल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी सांगलीच्या दौऱ्यावर आले. तासगाव, भिलवडी, मौजे डिग्रज येथील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्यानंतर दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलले. या वेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.

भाजपशी युती करा; भिडेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे
भारतीय जनता पक्ष व शिवसेना ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आली होती. सध्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली असली तरी शिवसेनेने हिंदुत्वाची नाळ लक्षात घेऊन पुन्हा एकदा भाजपशी ‘युती’ करावी, असे आवाहन एकेकाळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी सांगलीत केले.

नैसर्गिक आपत्तीचा शास्त्रीय अभ्यास करून मार्ग काढू
ठाकरे म्हणाले, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या सहा जिल्ह्यांतील आपत्तीची वारंवारता पाहिली तर स्वरूप भीषण होते. कृष्णा खोऱ्यातील सर्वच नद्यांना महापूर येतो. त्यामुळे निसर्गासमोर मुकाबला करण्यात काहीशी हतबलता निर्माण होते. पुराच्या पाण्यामुळे अनेक पूल वाहून गेले, घाट व रस्ते खचले, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या महापुराचा शास्त्रीय अभ्यास करून मार्ग काढणे हाच एकमेव उपाय आहे.

महापुराच्या रेषांत बांधकामांना मान्यता नाही
कृष्णा व वारणा काठावरील अनेक गावातील वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. तसेच दरडग्रस्त विभागातील बांधकामेदेखील दूर करावी लागतील, राज्य शासन यापुढे या दोन गोष्टींवर भर देऊन काम करेल. सांगली जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४० हजार नागरिकांना विस्थापित व्हावे लागले. महापुराच्या निळ्या व तांबड्या रेषेत बांधकामे करण्यास मज्जाव करण्यात येईल व लवकरात लवकर महापुरासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.

प्रामाणिकपणे प्रयत्न करणार एवढीच ग्वाही
सांगली जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देताना त्यांनी पूरगस्तांच्या नुकसानीबाबत मी कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही. तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे स्पष्ट केले. सरकार म्हणून जे जे सर्वसामान्यांच्या हिताचे आहे त्यासाठी सर्व प्रयत्न आपण प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना धीर दिला.

बातम्या आणखी आहेत...