आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात आजी-माजींची भेट:पूरग्रस्तांसाठी सरसावले उद्धवेंद्र! निरोप पाठवून उद्धव यांनी फडणवीसांसोबत केली पाहणी

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन घडवत शुक्रवारी आजी-माजी मुख्यमंत्री एकत्र आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात एकत्रितरीत्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. भररस्त्यात एकमेकांच्या कानाजवळ जाऊन काही बोलणीही झाली... अर्थातच कानोकानी राजकीय चर्चाही पसरल्या. मात्र, दोन्ही नेत्यांनी पूरग्रस्तांसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी एकत्रितपणे काम करण्याची बोलणी झाल्याचे स्पष्ट केले. नंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदांत एकमेकांना कानपिचक्याही दिल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते शाहुपुरी गल्लीत दुपारी १२ वाजता दाखल झाले. याच वेळी नृसिंहवाडीमधून मुख्यमंत्री ठाकरेंचा ताफा त्याच ठिकाणी सव्वाबारा वाजता आला. फडणवीस कुंभार गल्लीत आहेत असे समजताच उद्धव यांनी ‘आम्ही तिथेच येतोय तुम्ही थांबा, मिळून पाहणी करू,’ असा निरोप धाडला अन् दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट झाली.

मदत करण्याच्या सूचना
महापूर, दरडी, खचणाऱ्या रस्त्यांसाठी भूगर्भाचा अभ्यास, उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन, धोकादायक वस्त्या आहेत त्या गावांचेही पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

उद्धव : वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही, केंद्राला वेडीवाकडी मदतही मागणार नाही
1
. पूरग्रस्त क्षेत्रात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. सवंग लोकप्रियतेसाठी मी काहीबाही घोषणा करणार नाही. मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही. मी तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे.
2. संकट आले की लगेच केंद्राकडे मदत मागितली जाते. मी मागितलेली नाही. वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही अन् वेडीवाकडी मदत मागणार नाही. जे माझ्या राज्यात गरजेचे आहे तेच मी केंद्रातील सरकारकडे मागणार.
3. राज्यात दीड वर्षात अनेक आपत्ती आल्या. आघाडी सरकारने ३८ हजार कोटी रुपये दिले आहेत. ज्या गोष्टी आम्ही जाहीर करतो त्या पूर्ण करतो.
4. महाविकास आघाडीत समन्वय नाही असे बोलून जर कोणी राजकारण करत असेल तर मला एक सांगायचे आहे. मला राजकारण करून नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळायचा नाही.
5. त्यामुळेच कोल्हापुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत पाहणी करण्याची विनंती केली. या ठिकाणी भेटून पाहणी करून खुलेआम चर्चा केली...बंद दरवाजाआड नाही.

फडणवीस : मूल्यमापनाची ही वेळ नाही, तत्काळ मदत जाहीर करणे आवश्यक
1.
पॅकेज म्हणा किंवा मदत, पण घोषणा करा. सामान्य माणसांना तत्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटीत दोन विनंत्या केल्या - पूरग्रस्तांना तातडीची मदत करा आणि दीर्घकालीन तोडग्यासाठी मुंबईत बैठक घ्या.
2. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं आहे. त्या वेळी आम्ही सूचना मांडूच. पण पुरावर हाच दीर्घकालीन उपाय आहे. बॅकवॉटरमुळे लोकांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यावर काम करण्याची विनंती सरकारला करू.
3. ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याच्या मूल्यमापनाची ही वेळ नाही. मदत घोषित करा. ती योग्य की अयोग्य, याबाबतच्या भावना व्यक्त करेन.
4. सरसकट भिंत बांधण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अभ्यास असेल. पण पूरसंरक्षक भिंत काही ठराविक ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येत नाही.
5. पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवता येते. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी आम्ही ३५०० कोटींचा प्रस्ताव मांडला होता. त्याला जागतिक बँकेने तत्त्वत: मान्यता दिली होती. आता तो पुढे न्यावा.

माझ्यासाेबत तीन पक्ष, चौथा आल्यास... मुख्यमंत्री म्हणाले, पुरबाधित क्षेत्राबाबत उपाययोजनांसाठी एकत्र बैठक घेऊ. तुम्ही तुमचे उपाय, सूचना सांगा. समन्वयाने काम करू असे फडणवीसांना सांगितले आहेत. आता माझ्यासोबत ३ पक्ष आहेत. हा चौथा आला तर महाराष्ट्राचे हे प्रमुख पक्ष एकत्र आल्यावर जो निर्णय घेतील त्याच्याआड कोणी येणार नाही.

सोशल मीडियावर पूर : राजकीय विषयावर मतभेद असू शकतात! रयतेच्या हिताबाबत नाही. } एकमेका साहाय्य करू, राज्यातील परिस्थिती नियंत्रित करू, रयत हाच आपला खरा धर्म. } आता तुम्हीच महाराष्ट्र दूत हाेऊन दिल्लीतून मदत आणा, असे सांगितले असेल साहेबांनी. } मनातले मुख्यमंत्री... मनातली भेट. } भरपाईचे निकषही असेच मिळून ठरवा..

बातम्या आणखी आहेत...