आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासगी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि त्यांच्या तगाद्यामुळे दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या कुटुंबातील एकूण ९ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्यामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे. दोन वेगवेगळ्या घरांत राहणाऱ्या या कुटुंबीयांनी एकाच वेळी जेवणातून विष घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून मोठा भाऊ पोपट वनमोरे (५२) यांनी लहान भाऊ माणिक वनमोरे (४५) यांना रात्री ९ च्या सुमारास फोन करून ‘जेवण करायला हरकत नाही ना?’ अशी विचारणा करून आपल्या कुटुंबीयांना जेवण दिले. रात्री उशिरा अकरा ते बाराच्या सुमाराला दोन्ही घरातील कुटुंबीयांना उलटीचा त्रास जाणवू लागला आणि काही वेळातच संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले.
म्हैसाळ येथील नरवाड रोडजवळील अंबिका चौकानजीकच्या मळ्यात बांधलेल्या घरात शिक्षक पोपट वनमोरे राहत होते. येथून थोड्याच अंतरावर असलेल्या राजधानीनगर येथे डॉ. माणिक वनमोरे राहत होते. सोमवारी सकाळपासून डॉ. माणिक वनमोरे यांच्या घराचा दरवाजा उशिरापर्यंत बंद असल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून बघितले असता घरातील एकाच खोलीत ६ जण निपचित पडलेले दिसले. त्यांना शंका आल्याने त्यांनी ही घटना सांगण्यासाठी चौंडजे मळ्यात राहणारे पोपट वनमोरे यांचे घर गाठले असता तेथील घरातही ३ मृतदेह आढळले. त्यानंतर या खळबळजनक घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.
दोघा भावांनी एकमेकांशी बोलल्यानंतर केले जेवण
वनमोरे कुटुंबीयांनी रविवारी रात्री जेवणात विष कालवून आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. शिक्षक पोपट वनमोरे यांनी आपल्या डॉक्टर भावाला फोन करून रात्री नऊच्या सुमाराला जेवण करायला हरकत नाही ना, अशी विचारणा केली. त्यानंतर पोपट वनमोरे यांनी पत्नी संगीता, मुलगी अर्चनासोबत जेवण केले. तर तिकडे डॉ. माणिक यांच्या घरी डॉ.माणिक यांच्यासह पत्नी रेखा, आई आकाताई, मुलगी प्रतिमा, मुलगा आदित्य आणि पुतण्या शुभम ( पोपट यांचा मुलगा) अशा सहा जणांनी जेवण केले. या अन्नात शेतीसाठी वापरले जाणारे कीटकनाशक मिसळण्यात आले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी वनमोरे कुटुंबीयांच्या घरातील काही वस्तू जप्त केल्या असून कीटकनाशकाची एक बाटलीही जप्त केली आहे. या बाटलीत नेमके कोणते विष आहे, हे तपासण्यासाठी हे द्रव्य पुण्याला प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारपर्यंत नऊ मृतदेहांचे विच्छेदन केल्यानंतर आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला गती मिळेल, अशी माहिती सांगलीचे पोलिस अधीक्षक दीक्ष्त गेडाम यांनी सांगितले.
सधन गावातील करुण कहाणी
डॉ. माणिक वानमोरे यांच्या योग या बंगल्यात पोलिसांना ६ मृतदेह आढळून आले. त्यामुळे लोकांत एकच हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या बंगल्यासमोर बघ्यांची अशी गर्दी झाली होती.
चिठ्ठीत कुणा कुणाची नावे?
आत्महत्येपूर्वी पोपट वनमोरे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीत त्यांनी वनमोरे कुटुंबीयांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांची काही नावे लिहिली होती. पोलिसांनी त्या चिठ्ठीच्या आधारे रात्री उशिरापर्यंत ८ जणांना ताब्यातही घेतले. या चिठ्ठीत आणखीही काही नावे असू शकता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
तीन-चार वर्षांपासून आर्थिक तंगी
या कुटुंबीयांच्या शेजारी राहणार्यांनी सांगितले की, वनमोरे कुटुंब गेली तीन चार वर्षे आर्थिक संकटाशी सामना करीत होते. काही बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकाराकडूनही त्यांनी मोठी रक्कम उचलली होती. कर्जबाजारीपणामुळे या कुटुंबियांनी आत्महत्या केली असावी, असा त्यांचा सूर होता. . या घटनेची माहिती सकाळी अकराच्या सुमाराला पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्ष्तकुमार गेडाम, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, अप्पर पोलीस अधीक्षिका मनिषा डुबुले यांच्यासह मिरज पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला.
सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक सधन गाव म्हणून म्हैसाळची ओळख आहे. कृष्णाकाठी असलेले हे गाव ऊस, द्राक्ष, केळी व विड्याची पाने यासारख्या बागायती क्षेत्रासाठी ओळखले जाते. गेल्या १५ वर्षांपूर्वी म्हैसाळ पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास गेल्यानंतर या गावातील शेती अधिकच फुलली आहे. एकरी ८० टन ते १२० टनापर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी या गावात आहेत. पंधरा हजार वस्तीच्या या गावात १० राष्ट्रीयीकृत बँका, चार खासगी बँका, आठ शेड्युल्ड बँका, तसेच सुमारे २० सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. वनमोरे कुटुंबीयांनी शेतीसाठीच कर्ज घेतले असावे, असे सांगितले जाते. खासगी सावकारांच्या दहा टक्के व्याजामुळे हे सधन कुटुंब आर्थिक विवंचनेत फसले गेले असावे.
कोट्यवधी रुपयांची कर्जे
डॉ. माणिक वनमोरे आणि शिक्षक पोपट वनमोरे यांच्यावर बँकांसह खासगी सावकारांची कोट्यवधी रुपयांची कर्जे आहेत, अशी माहिती त्यांचे काही नातलग आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना पंचनाम्यादरम्यान सांगितल्याचे कळते. या कर्जाच्या ओझ्यामुळे तसेच सावकारांच्या तगाद्यामुळे वनमोरे कुटुंबातील सर्वच्या सर्व ९ जणांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्यांच्यावरील कर्जाच्या रकमेचा आकडा मंगळवारी कळू शकेल, असे पोलिस सूत्राने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.