आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात झाली आहे.
महसूल विभाग आणि वनविभागाने पहाटे 4 वाजेपासूनच हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. सुमारे 1500 पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे बांधकाम हटवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 लाच सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. या दिनाचे औचित्य साधतच राज्य सरकारने ही कारवाई सुरु केली आहे.
परिसरात कलम 144
अफजल खानाच्या कबरीच्या सुशोभीकरणावरुन यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. पुर्वी काही चौरस मीटरमध्ये असलेली ही कबर आता काही एकरांत पसरली आहे. यावर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी हे बांधकाम हटवावे अशी मागणी केली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी हा परिसर संपूर्ण परिसर 2006 पासून सील करण्यात आला होता. हा परिसर खुला करावा, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत होती. हा वाद न्यायालयातही गेला होता.
पर्यटकही हटवले
अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार हे अनधिकृत बांधकाम कडेकोट बंदोबस्तात हटवणे सुरू आहे. या परिसरात 144 कलम जारी करण्यात आलेले आहे. पोकलेन, जेसीबी व अनेक मजूर या कामासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. परिसरातील हॉटेलमध्ये असलेले पर्यटकही हटवण्यात आलेले आहेत आणि ती हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत.
कबरीचे उदात्तीकरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून किल्ले प्रतापगडच्या पायथ्याची असलेल्या अफजलखानाच्या कबरीकडे पाहिले जाते. मात्र काही वर्षांपासून येथील अतिक्रमण वाढले होते व त्याचे उदात्तीकरणही होत होते, असे बोलले जाते होते. अनेकदा कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याचा विषय म्हणून हे प्रकरण ऐरणीवर आले होते. याच कारणामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीण, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे पंधराशे पोलीस तैनात करण्यात आले होते आणि त्यांच्या बंदोबस्तात पहाटे चार वाजल्यानंतर अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
तोडकामाचे न्यायालयाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयानेदेखील कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारकडून यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख हे साताऱ्यात बदलून आल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच ही मोठी कारवाई हाती घेतली आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असल्याने कोठेही तणावाचे वातावरण नाही, असे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे. स्थानिक तसेच पत्रकारांनाही येथे जाण्यास सध्या बंदी करण्यात आली आहे.
संपूर्ण परिसर सील
दरम्यान, आज शिवप्रताप दिन आहे. त्यामुळे आजच्या दिवशी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावर प्रतापगडावर जात असतात. मात्र,आज कारवाईमुळे संपूर्ण परिसर बंद ठेवण्यात आला आहे. ही कारवाई कधी संपेल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, तोपर्यंत शिवप्रेमींना गडावर जाता येणार नाही. त्यामुळे शिवप्रेमींची अडचण होत आहे.
इतिहास काय?
१० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशहाचा सरदार अफजलखान याला मारले होते. त्याचबरोबर त्याचा वकील असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचेही मुंडके छाटले होते. या विजयाचे प्रतीक म्हणून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानची कबर येथे बांधली होती. परंतु गेल्या काही वर्षात या कबरीभोवती बांधकामे वाढली होती आणि त्याचे उदात्तीकरण ही होत होते.
खरा इतिहास समोर येईल
मात्र, आजच्या कारवाईबद्दल शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. काही शिवप्रेमींनी म्हटले आहे. अफजल खानाच्या कबरीसमोरील परिसर सील असल्याने कबरीबाबतचा खोटा इतिहास लोकांसमोर येत होता. आजच्या कारवाईनंतर हा इतिहास शिवप्रेमींसमोर येईल.शिवभक्तांसाठी ही अभिनानाची गोष्ट आहे.
राणेंनी मानले शिंदे, फडणवीसांचे आभार
भाजप नेते नितेश राणे यांनी अफजल खान कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसेच, 'अफजल खान थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवले!!! महाराष्ट्रात हिंदुत्वादी सरकार आहे. नाद नाही करायचा', असे ट्विटही नितेश राणेंनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.