आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अफजलखान कबरीच्या परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणावर सातारा जिल्हा प्रशासनाने अफजलखान वधदिनी बुलडोझर फिरवत सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. अत्यंत गोपनीयता बाळगत प्रशासनाने पहाटे ही कारवाई करण्यास सुरुवात केली असून सध्या प्रतापगड परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. कबर परिसराकडे जाण्यास मनाई करण्यात आली. प्रतापगड परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले. सातारचे जिल्हाधिकारी ऋषी रुचेश जयवंशी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू आहे.

अफजलखान कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्रीपासून जय्यत तयारी केली होती. कोल्हापूर परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील १६०० पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. हे पोलिस रात्रीच प्रतापगड परिसरात दाखल झाले. तसेच अवजड यंत्रसामग्री प्रतापगडाकडे जात होती. महाबळेश्वरच्या बाजारपेठेतदेखील पोलिसांची गस्त सुरू होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कसल्या तरी हालचाली सुरू असल्याची जाणीव स्थानिकांना झाली होती. मात्र, अत्यंत गोपनीयता बाळगत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहाटे प्रशासनाने कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे पाडली.

छ. शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ म्हणजेच आजच्या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध केला होता. या ऐतिहासिक घटनेला आज ३६३ वर्षे पूर्ण होत असतानाच जिल्हा प्रशासनाने अफजलखान कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. सध्या कबर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधात हिंदुत्ववादी संघटना सातत्याने आवाज उठवत होत्या. उच्च न्यायालयानेदेखील अनधिकृत बांधकामे काढण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करताना शासनाने वधदिनाचा मुहूर्त साधत कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर सर्जिकल स्ट्राइक केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

जवळपास आठ ते दहा दिवस कारवाई चालणार आहे या कारवाईच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी म्हटले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई आम्ही करत आहोत. जिल्ह्यात संपूर्ण कायदा व सुव्यवस्था आणि शांतता आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी प्रसारमाध्यमांची बोलताना सांगितले की, हा प्रश्न संवेदनशील असल्याने संपूर्ण गोपनीयता पाळली शांतता समिती व संबंधितांची बैठका घेऊन चर्चा झालेली आहे. कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही व घडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. अजून आठ ते दहा दिवस ही संपूर्ण कारवाई पूर्ण होण्यास लागतील.

‘अफजलखानाच्या मूळ कबरीला धक्का नाही’ प्रतिनिधी | कोल्हापूर किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखानाची कबर जशीच्या तशी राहील. कबरीच्या मूळ ढाच्याला धक्का लागूही देणार नाही. केवळ कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येत आहे, अशी स्पष्टोक्ती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. देसाई म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. कबरीच्या मूळ ढाच्याला काहीही करणार नाही. न्यायालयाने कबरीजवळ जे अनधिकृत बांधकाम दिवसेंदिवस वाढत आहे ते हटवावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार केवळ कबरीजवळील बांधकाम हटवण्यात येत आहे. अफजलखानाच्या कबरीच्या चारही बाजूंनी भिंतीचे बांधकाम आहे व त्यावर छत आहे. हे बांधकाम सुरक्षित ठेवण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...