आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला पुन्हा डिवचले:पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा, धनंजय मुंडे यांचा दावा; सुप्रिया सुळेंनीही तुळजाभवानीला घातले होते साकडे

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असा दावा महाविकास आघाडीतील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. ते साताऱ्यातील डिस्कळ इथल्या सभेत बोलत होते. यामुळे पुन्हा एकदा एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीचे नेते दररोज नवनवीन वक्तव्य करत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, असे साकडे तुळजाभवानीला घातले. त्यानंतर मुंडे यांचे हे वक्तव्य आल्याने नाना तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शेतकरी मेळावा गाजला

धनंजय मुंडे यांच्या उपस्थित झालेला खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील शेतकरी मेळावा चांगलाच गाजला. यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी त्यांनी पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री पदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच (राष्ट्रवादी) असल्याचे म्हटले.

मनसेची टीका

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटकरत मुंडेंच्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेना आणि राऊतांवर टीका केली आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असे धनंजय मुंडे म्हणत आहेत, तर मग संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय धुणी भांडी करायची का मग तुमची? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सेनेवर निशाणा साधला आहे.

सुळेंचेही साकडे

धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी "पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे" असे साकडे तुळजाभवानीला घातले होते. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत नेते मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही तिने पक्ष एकत्र असलो तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे.

25 वर्ष शिवसेनेचाचा मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाव तिथे शिवसेना शाखा स्थापन करण्याचे आदेश सर्वच जिल्हा प्रमुखांना दिले आहेत. तसेच शिवसेना गावागावात पोहोचवाच, पण 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील असे काम करा. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. राज्य सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत. विधानसभा निवडणुकीला अजून अडीच वर्ष बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आता पासूनच संघटनेच्या बळकटीवर लक्ष दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...