आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेने २०१८ पासून बचत गट सुरू केले होते. यापुढचे पाऊल टाकत आता बँकेेने तृतीयपंथीयांना कर्ज ही दिले आहे. समाजाकडून नेहमीच उपेक्षित राहिलेल्या तृतीयपंथी समाजाला अशा प्रकारे आर्थिक स्थैर्य येण्यासाठी जिल्हा बँकेने मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊलच म्हणावे लागेल. जिल्हा बँकेत तृतीयपंथीयांचे पाच बचत गट आहेत. पण सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी दोन तृतीयपंथींयांना कर्जाऊ रक्कम दिली आहे. नंतरच्या टप्प्यात इतरांना देणार असल्याची माहिती जिल्हा बँक उपनिरीक्षक राजू लायकर यांनी दिली आहे. तृतीयपंथीयांचे बचत गट स्थापन करणारी आणि बँकेमार्फत त्यांना कर्ज देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव बँक आहे. मुख्याधिकारी डॉ. ए. बी. माने, महिला कक्ष अधिकारी स्वामी यांच्या पुढाकाराने आणि अॅड. दिलशाद मुजावर यांच्या पाठपुराव्याने हे कर्ज देण्यात आले आहे.
सध्या दोन तृतीयपंथीयांना कर्ज दिले: २०१८ पासून मी प्रयत्न करून जिल्हा बँकेत तृतीयपंथीयांचे बचत गट सुरू केले आहेत. पण पहिल्यांदाच दोन तृतीयपंथीयांना २४ महिन्यांच्या मुदतीचे प्रत्येकी ४० हजार रुपयांचे कर्ज दिले. सुरुवातीला एक गट सुरू केला. त्यांचे काम उत्तम चालल्यामुळे नंतर पाच गट काढण्यात आले. शासनाच्या नाबार्ड जीआरवरून बँकेत एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार नाबार्डच्या धोरणानुसार कर्ज देताना कोणत्याही तारणाची गरज नाही. या नियमांवरून बँकेने त्यांना कर्ज दिले आहे. अजूनही ५ तृतीयपंथीयांचे बचत गट आहेत. त्यांनाही भविष्यात कर्जपुरवठा करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी करण्याचा बँकेचा मानस आहे, असे नाबार्ड जिल्हा प्रबंधक नंदू नाईक यांनी सांगितले.
कपडे विक्रीची व्यवसाय करणार
मी वीस वर्षांपासून बाजार मागून माझा खर्च भागवते. माझे १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे, पण मला नोकरी लागत नव्हती. बाजार मागून खाणे हे मलाही रुचत नव्हते. गेल्या काही वर्षांपासून आमच्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था, संघटना प्रयत्न करत आहेत. अॅड. दिलशाद मुजावर यांनी मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही कर्ज काढून व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. व्यवसाय सुरू केल्यावर समाजात सन्मानाने जगता येईल. माझ्यासोबत मैत्रीण संजनालाही कर्ज मिळाले असून आम्ही कपडे विक्रीचा व्यवसाय करणार आहोत. - मस्तानी, इचलकरंजी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.