आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रस्ता नसल्याने ओढ्याच्या पात्रात झाली प्रसूती; कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाड्यावरचे वास्तव

प्रिया सरीकर | कोल्हापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजरा तालुक्यातील हरपवडे येथील धनगरवाड्यावरील रंजना जयवंत झोरे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी रस्ता नसल्याने चादरीतून पायी नेण्याची वेळ आली. तीन किमीवर नावलकरवाडी येथे रुग्णालयात जाण्यापूर्वीच ओढ्याच्या पात्रात या महिलेची प्रसूती झाली. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. मात्र, वाड्या वस्त्यांवर आजही वीज, पाणी, रस्ते या प्राथमिक सुविधा नाहीत. अनेकदा यामुळे जीव गमावण्याची वेळ येथील नागरिकांवर येते हे वास्तव या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

आजरा आणि चंदगड भागात अशा वाड्या वस्त्या आहेत. आजरा तालुक्यात हरपवडे धनगरवाड्यावर सुमारे २० ते पंचवीस घरे आहेत. तेथे वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तसेच धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ताही नाही. रंजना झोरे यांना सोमवारी ( २१ फेब्रुवारी) रात्री नऊच्या सुमारास प्रसूतिवेदना सुरू झाल्या. त्यांना चादरीतून नावलकरवाडीला नेण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. धोंडिबा झोरे, जयवंत झोरे, राहुल झोरे, भागोजी झोरे यांनी चादरीचा पाळणा करून खाचखळग्यांनी भरलेली व धोकादायक उतार असलेली जंगलातील पायवाट तुडवण्यास सुरुवात केली.

धनगरवाड्यांवरील लेकी सुनांची परवड थांबणार का...?
वासनोलीपैकी जोगेवाडी धनगरवाड्यावर पावसाळ्यात डालग्याची डोली करून संगीता शिवाजी फटकारे यांना प्रसूतीसाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच प्रसूती झाली. ही घटना १९ जून २०२१ रोजी घडली. याच महिन्यात ६ जून रोजी एरंडपे धनगरवाड्यावरील संगीता फोंडे यांना घोंगडीची डोली करून प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल करत असताना पोटातच बाळाचा गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने सुनीता वाचली. धनगरवाड्यांवर बारमाही वाहतुकीची व्यवस्था नसल्याने असा संघर्ष त्यांच्यासाठी नित्याचा झाला आहे.

नवजात बाळाला घेऊन १ किमीचा प्रवास
तीव्र वेदनेमुळे या महिलेचा आकांत सुरू होता. त्यातच जंगलातील प्राणी, साप यांचीही भीती होती. २ किलोमीटर अंतर पार करताच रात्री अकराच्या सुमारास वाटेतच असलेल्या “कुमरीचा ओढा’ येथे महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मालुबाई झोरे व नकुशा झोरे या सोबतच होत्या. त्यानंतर नवजात बाळ व बाळंतीण यांना घेऊन एक किलोमीटर अंतर चालून नावलकरवाडी येथे आजरा ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. बाळ-बाळंतिणीची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...