आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचा परिसर आज पहाटे भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. हा सौम्य धक्का कोयना धरण परिसरात जाणवला.
भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून उत्तरेकडे अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका पोहचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
भूकंपाचा सौम्य धक्का
रविवारी पहाटे 3.53 मिनिटांनी कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. पाटण आणि कोयना परिसरात हा भूकंप जाणवला. भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहचलेला नाही. तसेच पाटण तालुक्यात अथवा कोयना परिसरारात कोठेही पडझड झालेली नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून 24 किलोमीटर तर कोयना धरणापासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीखाली 30 किलोमीटर इतकी होती. भूकंपाचा हा सौम्य धक्का केवळ कोयना परिसरातच जाणवला. भूकंपामुळे घराला तडे अथवा पडझड झाली नसल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
यंदाच्या वर्षाची सुरूवात भूकंपाच्या मालिकेने झाली. माण तालुक्यात दि. 26 फेब्रुवारी रोजी 10.30 वाजता त्यानंतर 1.30 वाजता आणि काही वेळातच भूकंपाचा तिसरा धक्का बसला होता. घबराट निर्माण झाली होती. भूकंपाच्या मालिकेमुळे 15 घरांना तडे गेले होते. तसेच घरातील भांडी देखील धडाधड खाली पडली होती. दुष्काळी तालुक्यात एकाच दिवसात तीनवेळा भूकंप झाल्यामुळे माणदेशातील नागरीक भयभीत झाले होते.
मागील वर्षात भूकंपाची मालिका
सातारा जिल्ह्यात 2022 मध्ये प्रामुख्याने कोयना धरण परिसरात भूकंप झाले. मागील वर्षी 8 जानेवारीला 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा पहिला धक्का बसला होता. त्यानंतर 1 फेब्रुवारीला 3.2 रिश्टर स्केलचा, 22 जुलै रोजी आणि दि. 28 ऑक्टोबर रोजी 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.
128 धक्क्यांची नोंद
सातारा जिल्ह्यात 2021 सालात लहान-मोठ्या भूकंपाची मालिकाच सुरू होती. एकूण 128 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली होती. त्यामध्ये 3 रिश्टर स्केलच्या 119 आणि 4 ते 4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या 9 धक्क्यांचा समावेश होता. भूकंपाच्या मालिकेमुळे पाटण तालुक्यातील नागरीक भयभीत झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.