आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीडशे कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (६८) यांच्यावर २४ एप्रिलपर्यंत कठोर कारवाई करू नका, असे आदेश मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी दिले हाेते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी ईडी पथकाने सकाळी त्यांच्या कागल येथील बंगल्यावर पुन्हा छापा टाकला. सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली ही कारवाई साडेनऊ तास चालली. रात्री उशिरा त्यांना समन्स बजावले. जबाब नोंदवण्यासाठी पुढील आठवड्यात त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांत मुश्रीफांविरोधात ईडीचा हा तिसरा छापा आहे. यापूर्वी ११ जानेवारीला त्यांचे कागल येथील घर, कार्यालये व त्यांची मुलगी, निकटवर्तीयांच्या पुण्यातील मालमत्तेवरही छापे टाकले होते. त्यानंतर मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेची एक फेब्रुवारीला झडती घेण्यात आली होती.
पत्नी म्हणाल्या, ‘आता आम्हाला गोळ्या घाला’ सकाळी पथक धडकले तेव्हा हसन मुश्रीफ घरात नव्हते. ‘घरी महिला, लहान मुले आहेत, आमचा छोटा मुलगा आजारी असताना ही कारवाई केली जात आहे. पथकासोबत महिला अधिकारी नाहीत. पुरुष अधिकारीच घरातील महिलांची चौकशी करून त्यांना त्रास देत अाहेत. मुश्रीफ यांनी आजवर समाजासाठी खूप काही केले आहे, मात्र ईडीकडून आम्हाला वारंवार त्रास दिला जातोय. अजून किती दिवस त्रास देणार आहात? त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून मारून टाका,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी माध्यमांना दिली.
आरोप १५८ कोटी घोटाळ्याचा, ईडीचा गुन्हा ३५ कोटी रुपयांचा मुश्रीफांनी १५८ कोटींचे मनी लाँड्रिंग केले, अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली. नलावडे साखर कारखाना मुश्रीफांनी जावयाच्या ब्रिक्स इंडिया कंपनीकडे चालवायला दिला. बोगस कंपन्यांद्वारे या कारखान्यात १५८ कोटी वळते केले, असा आरोप मुश्रीफांवर आहे. पण ईडीने चौकशीनंतर त्यांच्यावर ३५ कोटींच्या मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे.
वायकरांचा ५०० कोटींचा घोटाळा; सोमय्यांची तक्रार मुंबई | उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय, माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी राजकीय प्रभावाचा वापर करून जोगेश्वरीत फाइव्ह स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी मिळवून ५०० कोटींचा घोटाळा केला, अशी लेखी तक्रार किरीट सोमय्या यांनी शनिवारी आझाद मैदान पोलिस ठाण्यात दिली. त्याबाबतचे पुरावेही दिले आहेत. वायकर यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.